• Sat. Jun 6th, 2026

    Ashok Kharat: भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड; जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप

    Ashok Kharat: भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड; जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप

    Nashik Crime: हा अपघात नसून अशोक खरात याने केलेला घातपात असल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

    भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड; जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या व मुंबई आग्रा महामार्गापासून अगदी काही अंतरावर असलेल्या गवळणे येथील एका शेतकऱ्याने भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर जमिनीच्या वादातून आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. खरात याने जमिनी हडपण्यासाठी हा कट रचल्याचा दावा पीडित शेतकऱ्याने केला आहे. कैलास जाधव असे या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे.

    गवळणे येथील शेतकरी कैलास जाधव यांच्या कुटुंबाचा आणि अशोक खरात यांचा जमिनीवरून वाद सुरू होता. जाधव यांनी केलेल्या दाव्यानुसार, खरात याने फसवणूक करून त्यांची जमीन बळकावली होती. या वादावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र न्यायालयाचा अंतिम निकाल अवघ्या दोन दिवसांवर असतानाच जाधव यांच्या भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला.

    सन २०२२ साली विलास जाधव यांच्या भावाने अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांत धाव घेऊन जीविताला धोका असल्याची तक्रार दिली होती. मात्र अशोक खरात उर्फ कॅप्टन याचे बड्या राजकीय नेत्यांशी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते, असा आरोप जाधव यांनी केला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

    पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांचा आरोप

    भोंदू बाबा अशोक खरात याने नाशिकच्या पाथर्डी शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान पाथर्डी गावांमधील जाधव कुटुंबीय यांना त्यांची जमीन नावावर करून घेण्या प्रकरणी अशोक खरात याने त्रास दिल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याचदरम्यान विलास जाधव यांच्या भावाची हत्या अशोक खरातकडून हत्या करण्यात आली आहे, असा त्यांनी आरोप केला आहे. मात्र भोंदू बाबाचे संबंध अनेक मोठ्या लोकांशी असल्याने त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा