मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, अशोक खरात प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर काटेकोरपणे मॉनिटरिंग सुरू आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनाही (डीजी) विशेष सूचना देण्यात आल्या असून नाशिक पोलीस आणि एसआयटी यांच्या माध्यमातून सखोल तपास सुरू आहे. तपासात कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणात आणखी काही महिला पुढे आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अनेक महिला सामाजिक दबाव, भीती आणि बदनामीच्या कारणामुळे आतापर्यंत पुढे येत नव्हत्या. मात्र आता त्यांना धीर देऊन पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू असून काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महिलांना न्याय मिळवून देणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी काही मंत्र्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, हवेत बोलण्याला काही अर्थ नाही. ज्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत त्यांनी ते पुढे आणावेत, सरकार नक्कीच कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या प्रकरणावर राजकारण करू नये, असा सल्लाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, खरात यांच्यासोबत काही नेत्यांचे फोटो समोर आल्याने विरोधकांकडून राजीनाम्यांची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, फोटोवरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. ठोस पुरावे आवश्यक आहेत. कोणीही कोणासोबत फोटो काढू शकतो. मात्र ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून ४० किलोमीटर दूरवरून पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मंत्र्यांबद्दल बोलणारे काही जण इतर प्रकरणांवर गप्प का आहेत? सिलेक्टिव्ह बोलणं थांबवायला हवं, सरकारला या प्रकरणात राजकारण करण्याची अजिबात इच्छा नाही. आमचा इंटरेस्ट राजकारणात नाही, तर महिलांच्या सन्मानात आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.