• Mon. Jun 15th, 2026
    Adinath Maharaj : ‘जननेंद्रियाचा त्याग स्वतःहून केला, कोणाचाही काहीही त्रास नाही’; तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींचा खुलासा

    अहिल्यानगर येथील तारकेश्वर गड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सात दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ‘तो’ प्रकार स्वतःहून केल्याचा मोठा खुलासा आता केला आहे.

    महंत आदिनाथ महाराजांचा खळबळजनक खुलासा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या तारकेश्वर गड प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. सात दिवस रुग्णालयात झुंज दिल्यानंतर तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांना अखेर आज खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत दाखल झालेल्या महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असले, तरी या प्रकरणातील गूढ मात्र अधिकच वाढले आहे.

    ‘जो काही लिंग त्याग झाला, तो मी स्वतःहून करून घेतला’

    या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी देत आदिनाथ महाराजांनी स्वतःच एक खळबळजनक दावा केला आहे. ‘जो काही जननेंद्रियाचा त्याग झाला, तो मी स्वतःहून करून घेतला, कोणाचाही काहीच त्रास नाही’, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. या एका वक्तव्याने संपूर्ण प्रकरणाचा सूरच बदलला असून आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी तारकेश्वर गडावर घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला होता. महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःवरच धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकारात ते गंभीर जखमी झाले होते आणि तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. हा प्रकार नेमका आत्मघाताचा प्रयत्न होता की त्यामागे काही वेगळं कारण आहे, याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र आदिनाथ महाराजांनी स्वतः या गोष्टीचा आता खुलासा केला आहे.

    Maharashtra TimesSangli News : पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकांना कोणी संपवलं? पोलीस तपासात गूढ उकललं

    धार्मिक क्षेत्रातही मोठी खळबळ

    या प्रकारामुळे धार्मिक क्षेत्रातही खळबळ उडाली असून महाराष्ट्रात संत, महंत आणि धार्मिक गुरूंना अत्यंत मानाचे स्थान आहे. प्रवचन, कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून मोठा भक्तवर्ग निर्माण करणाऱ्या अशा महंताकडूनच असा प्रकार घडल्याने धार्मिक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. परंतू महंतांच्या खुलाशानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तारकेश्वर गड प्रकरण आता केवळ एक घटना न राहता गूढ आणि धक्कादायक वळण घेत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    आमदार संग्राम जगतापांची प्रतिक्रिया

    “आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि व्यवस्थित आहे. धर्म आणि संस्कारांचा वारसा जपत समाजप्रबोधनाचे कार्य करणारे आदिनाथ महाराज हे सर्वांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. उपचारानंतर ते आज सुखरूपपणे गडावर परत जात असून त्यांच्या आगमनामुळे भक्तांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे” अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा