• Tue. Jun 16th, 2026
    LPG Shortage : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

    राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगावार तेल आणि गॅस टंचाईचे संकट गडद झाले आहे. या युद्धामुळे भारतातील गॅसचा साठा पाहता सरकारने केवळ घरगुती सिलेंडरचे उत्पादन आणि वितरण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. केंद्र सरकारने सर्व उद्योगधंद्यांना गॅसचं वितरण करणं काही काळासाठी थांबवलं होतं. पण आता सरकारकडून परत गॅसचे वितरण केले जात आहे. दुसरीकडे गॅसचे वितरण बंद झाल्यामुळे राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहार गृह ठप्प झाले होते. पण राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देणारं वृत्त समोर आलं आहे. केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्ध व्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी 20 टक्के एलपीजी पुरवठा करण्याचे केंद्राचे निर्देश असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे.

    छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

    “केंद्र सरकारकडून काल एक पत्र राज्य सरकारला प्राप्त झालेलं आहे. त्या पत्राद्वारे भारत सरकार पेट्रोलिय आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून व्यापारी LPG च्या वाटपाबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना सूचना दिल्या आहेत. 18 मार्च 2026 च्या केंद्र सरकारच्या पत्राप्रमाणे PNG विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच सुरुवातीला 20 आणि नंतर 10 असे 30 टक्के वाटप मंजूर करण्यात आले आहे. आता 23 मार्चपासून पुढील सूचना येईपर्यंत आणखी 20 टक्के वाटप मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण वाटप 50 टक्के होईल”, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

    आता हॉटेल, उपहारगृहांना 50 टक्के गॅसचे वाटप

    “याचाच अर्थ पूर्वी जितके मिळत होतं त्याच्या 50 टक्के हा कोटा आहे. पण या वाटपासाठी काही शर्थी दिलेल्या आहेत. अतिरिक्त 20 टक्के वाटप हे हॉटेल, ढाबे, उपहारगृह, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, सामूदायिक स्वयंपाक घरे, स्थलांतरीत मजुरांसाठी पाच किलो FTL अशारितेने वाटप करुन त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असं पत्रात म्हटलं आहे”, अशी माहिती भुजबळांनी दिली.

    औद्योगिक ग्राहकांसाठी सरकारच्या अटी काय?

    “इतर व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना 50 टक्के LPG मिळवण्यासाठी पात्र होण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांच्या व्यवसाय क्षेत्राचे आणि LPG च्या वार्षिक आवश्यकतेची नोंद स्वतंत्र डेटाबेसवर ठेवावी. सर्व व्यापारी, औद्योगिक LPG ग्राहकांना एकूण 50 टक्के वाटपातून LPG मिळवण्यासाठी पात्र होण्यापूर्वी त्यांच्या शहरातील, जिल्ह्यातील सिटी गॅस डिस्ट्रब्युटर्सकडे PNG साठी अर्ज करणं आणि ते प्राप्त करण्याच्या सज्जतेसाठी आवश्यक आहे. असं करणं बंधनकारक आहे”, असं केंद्र सरकारच्या पत्रात नमूद असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा