• Sat. Aug 1st, 2026

    Thane Ring Metro: ठाणे मेट्रोसाठी 12 हजार कोटी, शहरांतर्गत वर्तुळाकर प्रकल्प; 29 किमी मार्गावर 22 स्थानकं

    Thane Ring Metro: ठाणे मेट्रोसाठी 12 हजार कोटी, शहरांतर्गत वर्तुळाकर प्रकल्प; 29 किमी मार्गावर 22 स्थानकं

    Thane Metro: ठाणे शहरांतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा मार्ग 29 किमी लांब असून ही मेट्रो 2029पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानकं असतील.

    श्रीकांत सावंत, ठाणे: ठाणे शहराची बहुप्रतीक्षित शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पातील अडथळ्यांची शर्यत संपली असून या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला महामेट्रो प्राधिकरणाकडून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून दुय्यम कर्जाचा २४ कोटींचा दुसरा हप्ता नुकताच महामेट्रो प्राधिकरणाला देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्य सरकारकडून या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी महामेट्रोला ५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १२ हजार २०० कोटी रुपये असून राज्य सरकारकडून या मेट्रोच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यात येत आहे. ही रक्कम मिळाल्यामुळे ठाणे मेट्रोच्या कामांना गती मिळाली असून सन २०२९ पर्यंत प्रकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

    कसा असेल मार्ग?

    ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे शहरांतर्गत २९ किमी लांबी व २२ स्थानके असलेल्या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करून राज्य आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला होता. राज्य आणि केंद्राच्या टोलवाटोलवीनंतर अखेर २०२४मध्ये या प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली. १२ हजार २०० कोटी रुपये प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारचे समभाग, ठाणे महापालिकेचे प्रकल्पासाठी अनुदान, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत, बांधकाम कालावधी दरम्यान व्याजासाठी सुमारे ५ हजार ७८ कोटी रुपये महामेट्रोला देण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आले आहेत.Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: बीकेसी ते शिळफाटा 20 किमी भुयारी मार्गातून धावणार ‘बुलेट ट्रेन’; डोंगर, खाडीखालूनही बोगदा, लवकरच खोदकाम सुरू

    तर, केंद्र सरकारच्या कराच्या ५० टक्के खर्चासाठी ३५४ कोटी आणि राज्य सरकारचे कर व शुल्क यांवरील खर्चासाठी ६१५ कोटी रुपये असे ९६९ कोटी रुपये रक्कम राज्य सरकारकडून बिनव्याची दुय्यम कर्ज सहाय्य म्हणून महामेट्रोला उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो कामाला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने पहिल्या हप्त्यामध्ये २६ कोटी रुपयांची रक्कम डिसेंबर २०२५मध्ये दिली होती. काम सुरू झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २४ कोटींचा हप्ता देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण ५० कोटी रुपये महामेट्रोला वितरित करण्यात आले आहेत.

    यापुढील कामानुसार रक्कम राज्य सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणारे दुय्यम कर्ज बिनव्याजी असणार आहे. विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्पासाठी अन्य मार्गातून उभारण्यात येणारे कर्ज फेडल्यानंतर बिनव्याजी दुय्यम कर्ज फेडण्याची मुभा प्राधिकरणाला असणार आहे.

    वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचे आर्थिक स्रोत…

    ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्गासाठी लागणाऱ्या निधीसाठी राज्य सरकारकडून आर्थिक स्त्रोत निश्चित करण्यात आले असून त्याचा भार ठाणेकरांवरही पडणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूंना ५०० मी. अंतरापर्यंत येणाऱ्या जमिनीवर, अधिमूल्य आकारून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद. त्यानुसार अधिमूल्याची रक्कम संबंधित क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणाकडून वसूल केली जाणार.

    Maharashtra TimesMumbai Metro: भुयारी मेट्रोत पुन्हा ‘नो नेटवर्क’, कंत्राटदारासोबत करार रद्द करण्याचा निर्णय; सर्व कंपन्यांच्या सेवा होणार बंद

    • अशा वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकापोटी वसूल अधिमूल्याच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम मेट्रो प्रकल्पाकडे वर्ग करणार
    • शहर विकास शुल्कात १०० टक्क्यांपर्यंत वाढ करून कायद्यातील तरतुदीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात वसूल होणाऱ्या रकमेतून उचित हिस्सा मेट्रो प्रकल्पासाठी दिला जाणार
    • नागरी वाहतूक प्रकल्प राबविण्यासाठी येणाऱ्या शहर मालमत्तेवर मुद्रांक शुल्कासोबत १ टक्के मेट्रो अधिभार लावण्याची तरतूद. याद्वारे गाद्वारे मिळणाऱ्या मिळणाऱ्या रकमेतून मेट्रो प्रकल्पाला हिस्सा दिला जाणार.
    • मेट्रो कारडेपोच्या जागेच्या वाणिज्य विकासाद्वारे मिळणाऱ्या रकमेतून मेट्रो प्रकल्पासाठी खर्च केला जाणार.
    • वरील सर्व स्रोतांतून मिळणारा सर्व निधी राज्य सरकारच्या समर्पित नागरी परिवहन निधीमध्ये जमा करून त्याचा या खर्चासाठी उपयोग केला जाणार आहे.
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा