Pune Crime News : कोथरूडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून कोयता गँगने एका कुटुंबावर हल्ला केला आहे. त्यात कुटुंबीय हादरून गेले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
“वस्तीमध्ये का फिरता?”
गणजय सोसायटी परिसरात राहणारे राहुल गायकवाड (वय २२) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. १५ मार्चच्या रात्री राहुल आणि त्यांचे मित्र परिसरातून जात असताना काही तरुणांनी त्यांना अडवत “वस्तीमध्ये का फिरता?” असा सवाल करत वाद घातला. स्थानिकांनी हस्तक्षेप केल्याने तो वाद तात्पुरता शांत झाला, मात्र आरोपींनी हा अपमान मनात ठेवत सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
घरावर हल्ला
१९ मार्च रोजी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास आरोपींचा गट थेट राहुल यांच्या घरात घुसला. आरडाओरडा करत त्यांनी घरात भीतीचं वातावरण निर्माण केलं. हातात धारदार शस्त्रं घेत दरवाजे, भिंती आणि स्वयंपाकघरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. खिडक्यांवर दगडफेक करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.
Dombivli मध्ये डॉग फूड बनवणाऱ्या कारखाना परिसरात सात भटक्या कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू, मालक आणि कामगारांवर गुन्हा दाखल
मारहाण केली
यावेळी राहुल आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी झालेल्या या हल्ल्यात कुटुंबीय जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या शेजाऱ्यांनाही आरोपींनी धमकावलं. इतकंच नाही, तर सोसायटीच्या पार्किंगमध्येही आरोपींनी आणखी दोन तरुणांना मारहाण करत दहशत पसरवली.
उपचार सुरु
या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ५ जणांना अटक केली असली तरी स्थानिकांमध्ये मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याची चर्चा रंगली आहे.
गुन्हा दाखल
पोलिसांनी मात्र फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपासात आणखी आरोपींवर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
