• Sun. Jun 14th, 2026
    Ashok Kharat सोबतच्या फोटोंवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘फोटो प्रसिद्ध करणं ही अतिशय चुकीची बाब’

    अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर आता माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित फोटो नेमका कधीचा आहे? याची माहिती केसरकर यांनी दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरातने केलेल्या कृत्याचा दीपक केसरकर यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच अशोक खरात याच्यासोबत आपली ओळख असली तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती. अशोक खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल करुन राजकीय आरोप केले जात आहे ते आरोप अत्यंत चुकीचे आहेत, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. अशोख खरात याच्यासोबत आपली ओळख नेमकी कशी झाली? याबाबतही दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे.

    दीपक केसरकर काय म्हणाले?

    “कॅप्टन अशोक खरात यांना अटक झाली आहे. अतिशय घृणास्पद अशा आरोपांच्या संदर्भात ही अटक आहे. याचा निषेध मी निश्चितपणे करतो. या प्रकरणी जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. पण खरात यांच्या ओळखीच्या लोकांना यामध्ये गुंतवणे, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं ही अतिशय चुकीची बाब आहे. एक फोटो प्रसिद्ध झाला आहे, त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, खासदार श्रीकांत शिंदे आहेत, मी आहे. हा जो फोटो आहे तो ईशानेश्वर मंदिरासाठी रोडची मागणी करण्यासाठी कॅप्टन खरात मुंबईला आले होते, त्यावेळचा तो फोटो आहे. हा रस्ता तयार सुद्धा झाला आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.

    ‘राजकीय आरोप चुकीचे’

    “ईशानेश्वर मंदिरामुळे माझी कॅप्टन खरात यांच्यासोबत ओळख झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी स्वत: देवभक्त असल्यामुळे शिर्डीत जात असताना वाटेत सिन्नरमध्ये ईशान्यश्वर मंदिरात कधीतरी जाणं निश्चित होत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे कॅप्टन खरात यांना ज्योतिषाचा चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांशी त्यांची ओळख आहे. पण यामुळे काही राजकीय आरोप केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे आहे”, असंदेखील दीपक केसरकर म्हणाले.

    केसरकरांनी दोन फोटोंवर दिले स्पष्टीकरण

    “विशेषत: खासदार संजय राऊत यांनी आरोप केले आहेत की, खरात माझे खाते चालवायचे. ते कसे चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. दुसरा फोटो खरात यांच्या मुलीच्या लग्नाचा आहे. ज्यांच्यासोबत आपली ओळख आहे त्यांच्या लग्नाला आपण जातो. शुभेच्छा देतो. त्यांच्याशी होत असलेल्या भेटीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची चर्चा कधी झालेली नाही. त्यामुळे माझ्या सारख्या अनेक राजकीय लोकांना केवळ ओळख आहे म्हणून फोटो प्रसिद्ध करणे किंवा काहीतरी मजकूर छापून आणणे हे अत्यंत चुकीचे आहे. अनेक लोकांची ओळख त्यांच्याशी झाली आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत संबंध जोडणं चुकीचं आहे. झालेल्या कृत्याचा मी निषेध करतो”, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा