• Sun. Jun 7th, 2026
    Nagpur News : याला म्हणतात दादागिरीचं भूत उतरवणं! नागपुरात महिला पोलिसांनी हल्लेखोरांची काढली धिंड

    नागपुरात एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींची नंदनवन पोलीस ठाण्याच्या महिला पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचं नंदनवनात कौतुक केले जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : भाईगिरी आणि गुंडगिरी करणाऱ्या तरुणांच्या योग्यवेळी मुसक्या आवळणं आणि त्यांना योग्य वाटेवर आणणं हे जास्त आवश्यत आहे. अशा तरुणांना वाममार्गातून परत चांगल्या मार्गावर आणण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. अशा तरुणांच्या आई-वडिलांकडूनदेखील अनेकदा प्रयत्न केले जातात. नातेवाईकांकडूनही प्रयत्न केले जातात. किंवा अनेकदा अशा तरुणांच्या नादी लागायला नको म्हणून कुणीच त्यांना योग्य मार्गाचा सल्ला देत नाही. तर दुसरीकडे अराजकतेच्या दुनियेत प्रवेश केलेल्या तरुणांना आपण काय करतोय याचं भान राहत नाही. ते अनेकदा वाटेल त्याचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. तसेच चोरी, हाणामारी, लुटमार सारखे प्रकार करतात.

    अशाप्रकारचे कृत्य करणारे आरोपी एवढ्यावरच थांबत नाहीत तर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याबद्दल परिसरात भीती निर्माण व्हावे यासाठी ते आणखी अराजकतेचा मार्ग निवडतात. अशा तरुणांना वठणीवर आणण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. नागपूरच्या महिला पोलिसांनी अशात तीन तरुणांना वठणीवर आणण्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. गंभीर प्रकारचे गुन्हे करणाऱ्या तिघांची महिला पोलिसांनी ते राहत असलेल्या परिसरातून धिंड काढली आहे. यावेळी आरोपी शरमेने मान खाली घालताना दिसले.

    नागपुरात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणात अटकेतील तीन हल्लेखोरांची शनिवारी सायंकाळी नंदनवन पोलिसांनी धिंड काढली. नंदनवन पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिसांनी आरोपींची परिसरात धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचे नंदनवनमध्ये कौतुक करण्यात येत आहे. वैभव अशोक तन्नेलवार (वय ३४ रा. वृंदावननगर), संकेत गुलाबराव वंजारी (वय २४ ) आणि तुषार दिलीप पळसापुरे (वय २५, दोन्ही रा. ईडब्ल्यूएस कवेलू क्वॉर्टर) अशी धिंड काढण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

    नोव्हेंबर महिन्यात तिघांनी नंदनवनच्या दत्त मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या 21 वर्षीय तरुण नॅव्ही देवेंद्र रामटेके याच्यावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिघांनी सुभाष डेहनकर यांना लुटले. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या तीन महिन्यांपासून हल्लेखोर पसार होते. पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली नंदवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरूवारी तिघांना अटक केली.

    Nagpur News

    धिंड काढून या तिघांच्या दादागिरीचे भूत उतरविण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी घेतला. महिला पेालीस उपनिरीक्षक प्रतीक्षा पाटील, सविता यादव, अलका ढेंगरे, अर्मिला टोहणे, शीला बिसेन, रूपाली भुंबर,किरण गवई, प्रतिभा इंगोले, प्रियंका डोंगरे, आरती शुक्ला , कांचन परिहार,सोनाली ठाकरे आणि नंदनवन पोलिसांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या तीन तीन हल्लेखोरांची निर्मल नगरी, सदभावनानगर आणि नंदनवन झोपडपट्टी परिसरात धिंड काढली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा