• Fri. Jun 5th, 2026
    Dombivli मध्ये डॉग फूड बनवणाऱ्या कारखाना परिसरात सात भटक्या कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू, मालक आणि कामगारांवर गुन्हा दाखल

    डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ७ मुक्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

    भटके कुत्रे (एआयने निर्मित फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, ठाणे , (डोंबिवली) : कारखान्यात पेस्ट कंट्रोल केल्यामुळे परिसरातील सात भटक्या कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या कारखाना मालक, त्याचा भाऊ आणि एका कामगाराच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार कुत्र्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पशूंच्या शासकीय रूग्णालयाकडे पाठवून दिले आहेत.

    नेमकं काय घडलं?

    डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकलव्य ॲनिमल पेडीगिरी नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात कुत्र्यांसाठी डॉग फूड तयार केले जाते. विषाणू आणि कीटकांचा उपद्रव वाढल्यामुळे या कारखान्याचे मालक विरेंद्र कुमार निशाद यांनी काही दिवसांपूर्वी कारखान्यासह आजूबाजूच्या परिसरात पेस्ट कंट्रोल केले होते. याच दरम्यान परिसरातील सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील प्राणी मित्र सुचित्रा सुर्वे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

    पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

    या संदर्भात सुचित्रा सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारखाना मालक विरेंद्र कुमार निशाद, त्यांचा भाऊ आणि एका कामगाराने कारखान्यात उंदीर मारण्याचे औषध टाकल्याने ते औषध खाऊन परिसरातील भटक्या कुत्र्यांचे मृत्यू झाले. इतकेच नाही तर आपल्या पतीला कारखाना मालक आणि त्यांच्या कामगारांवर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुचित्रा सुर्वे यांंनी केला आहे.

    Maharashtra TimesNanded News : ईदचं नमाज पठण सुरु होतं, दुचाकीसह तरुण जिवंत जळाला, वाजेगाव बंधाऱ्यावर काय घडलं? एटीएसकडून तपास सुरू

    कुत्र्यांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवले

    एकीकडे मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मृत्यू पावलेल्या सात पैकी चार कुत्र्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पशूंच्या शासकीय रूग्णालयाकडे पाठवून दिले आहेत. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    Maharashtra TimesAshok Kharat : भोंदूबाबा खरातविरुद्ध आणखी तीन महिला पुढे आल्या, लॅपटॉप, CCTV ते CDR; SIT कडून सखोल चौकशी सुरू

    या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत ढोले अधिक तपास करत आहेत. कुत्र्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे अहवालातून स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेनंतर डोंबिवलीतील प्राणी मित्रांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा