• Wed. Jun 10th, 2026

    Mohan Bhagwat : ‘सध्याची युद्धं भारतच थांबवू शकतो, आजची युद्धं स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर’; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य

    Mohan Bhagwat : ‘सध्याची युद्धं भारतच थांबवू शकतो, आजची युद्धं स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर’; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य

    “आजची युद्धे स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर”; नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली जागतिक संघर्षावर चिंता.

    मोहन भागवत यांचे जागतिक युद्ध परिस्थितीवर भाष्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : जागतिक पातळीवर वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संघप्रमुख मोहन भागवत यांनी गंभीर चिंता व्यक्त करत “आजची युद्धे ही केवळ स्वार्थासाठी होत आहेत आणि जग विनाशाच्या काठावर उभे आहे,” असे ठाम मत व्यक्त केले. नागपुरात विश्व हिंदू परिषदाच्या विदर्भ प्रांत कार्यालयाच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, सध्याच्या घडीला जग अस्थिरतेच्या अवस्थेतून जात आहे. विविध देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष, युद्धजन्य वातावरण आणि वर्चस्वासाठी चाललेली स्पर्धा ही सर्वस्वार्थातूनच उद्भवलेली आहे. “माझ्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडून घेऊन येईन” ही मानसिकता युद्धांना कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    ‘सर्वांना जोडून ठेवण्याची ताकद..’

    ते पुढे म्हणाले की, जगात सर्वांना एकत्र जोडणारा कोणताही प्रभावी तत्व आज अस्तित्वात नाही. मात्र, भारताकडे हे सामर्थ्य आहे. “सर्वांना जोडून ठेवण्याची ताकद भारतात आहे. आपल्या ऋषी-मुनींनी दिलेल्या ज्ञानामुळेच हे शक्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, जगभरातून भारताकडे आशेने पाहिले जात आहे आणि काही ठिकाणी असा विश्वासही व्यक्त केला जात आहे की सध्याचे युद्ध भारतच थांबवू शकतो असेही भागवत म्हणाले.

    ‘शक्तीशिवाय कोणीही ऐकत नाही’

    भागवत पुढे म्हणाले की, “शक्तीशिवाय कोणीही ऐकत नाही”, “आपण मानवतेच्या कायद्याने चालतो, मात्र जगातील अनेक भाग अजूनही जंगलाच्या कायद्याने वागत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. त्यांनी धर्म, संस्कार आणि अनुशासन यांची गरज अधोरेखित करत समाजाने एकत्रितपणे पुढे जाण्याचे आवाहन केले. धर्माच्या अज्ञानामुळेच माणूस लोभ आणि स्वार्थाच्या मार्गावर जातो, असे सांगत त्यांनी मंदिरांना संस्कार केंद्र म्हणून महत्त्व दिले.

    Maharashtra TimesPune Crime : पुण्यातील सोसायटीत गेटवर राडा, प्रवेश नाकारल्याने वॉचमनवरच काठीने हल्ला

    “पूर्वी मंदिर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नव्हते, तर ते समाजाला दिशा देणारे केंद्र होते,” नव्या भारताच्या संविधानातही या मूल्यांचे प्रतिबिंब दिसून येते. समाजाला एकत्र आणणे, त्याला बळकट करणे आणि संपूर्ण जगाला योग्य दिशा देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विश्व हिंदू परिषदेसारख्या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.

    ‘काही लोक कायद्याच्या आडून इतरांवर…’

    मोहन भागवत यांनी अमेरिकेवरही अप्रत्यक्ष टीका केली. “काही लोक कायद्याच्या आडून इतरांवर आघात करतात,” समाजाला जोडण्यासाठी आणि भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा. “जे काही आहे ते सर्वांचे आहे, ही भावना रुजवणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा