Nashik Crime: खरात प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली असून, आयपीएस अधिकारी सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी आता काय सत्य समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.
नीरज जाधव हा अशोक खरात याच्या नाशिकमधील शरणपूर रोड येथील ‘ओकस प्रॉपर्टी ‘ या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. कोरोना काळापर्यंत तो अशोक खरात याच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. नीरज जाधव हा नाशिक येथीलच रहिवासी आहे. कॅप्टन अशोक खरात याच्या कार्यालयात महिलांसोबत सुरू असलेल्या काळ्या कारनाम्यांची माहिती नीरज याला मिळाली होती. त्यानंतर त्याने अशोक खरात याचे काही महिलांसोबतचे गैरकृत्याचे व्हिडिओ चोरून नेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एवढ्यावर न थांबता त्याने पैशांच्या हव्यासापोटी कॅप्टन खरात याला ब्लॅकमेलिंग सुरू केले. कोट्यवधीची खंडणी त्याच्याकडून खरात याच्याकडे मागण्यात आली. मात्र खरात याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयित नीरज जाधव याने त्याचा मोर्चा पीडित महिलांकडे वळवला. शिर्डी येथील एका २४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाईलवर काही मॉर्फ केलेले फोटो नीरजने आणि त्याच्या अन्य साथीदार यांनी पाठवले आणि हे व्हिडिओ, तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र सदर महिलेने पुढे येत संशयित नीरज जाधव याच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आपला पहिला प्लॅन फसल्यानंतर नीरज जाधव याने आपला मोर्चा नाशिकमधील एका महिलेकडे वळवला. नाशिकमधील एका महिलेला नीरज याने अशाच पद्धतीने ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. मात्र महिलेच्या सासरकडील नातेवाईकांनी तिला धीर देऊन याबाबत सरकारवाडा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आणि या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले. अशोक खरात आणि त्याचा माजी सहकारी नीरज जाधव यांचा खरा चेहरा जगासमोर आला.
