छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यसनाधीन पित्याने १३ वर्षांच्या चिमुकलीचा ३० वर्षांच्या नवरदेवाशी विवाह लावून दिला. यानंतर दामिनी पथकानं तातडीने कारवाई करत, सासरच्या तावडीतून मुलीची सुटका केली आहे.
नेमकी घटना काय?
या घटनेत प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीचे वडील व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यांनी आजी, आत्या आणि काका-काकूंनी मिळून या १३ वर्षीय बालिकेला ३० वर्षांच्या नवरदेवाच्या गळ्यात बांधले. कचनेर येथील धारेश्वर मंदिरात दुपारी ४ वाजता हा विवाह पार पडला होता. मुलीच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिली. अवघ्या काही तासांतच मुकुंद नगर येथील ‘सासर’ गाठून या मुलीला ताब्यात घेतले.बालिकेला या विवाहाबद्दल काहीही समजत नव्हते. पोलिसांसमोर तिने रडत रडत आपली व्यथा मांडली, “माझ्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी माझे बळजबरीने लग्न लावून दिले, मला हे लग्न मान्य नाही.” तिच्या या शब्दांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.
Mohan Bhagwat : ‘सध्याची युद्धं भारतच थांबवू शकतो, आजची युद्धं स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर’; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य
बालिकाश्रमात सुरक्षित निवारा
बालकल्याण समितीचे नितेश दुर्वे यांच्या उपस्थितीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या या मुलीची रवानगी बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार ‘भगवान बाबा बालिकाश्रम’ येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पित्यासह सर्व नातेवाईकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील निर्मला निंभोरे (हेड कॉन्स्टेबल), सरिता कुंडारे, रानी केदार यांनी ही धडक कारवाई केली. त्यांना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे एएसआय पवार, नितेश दुर्वे (बाल सुरक्षा अधिकारी) आणि पीटर मोबाईल पथकाने मोलाची साथ दिली.
