• Sat. Jun 13th, 2026

    Satara ZP : पोलीस आणि मंत्र्यांची पहिल्यांदाच झटापट, सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत टोकाचं राजकारण

    Satara ZP : पोलीस आणि मंत्र्यांची पहिल्यांदाच झटापट, सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत टोकाचं राजकारण

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रचंड नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली. पण त्याआधी भरपूर घडामोडी घडल्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी नाट्यमय घडामोडी, तणाव आणि प्रचंड गोंधळात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन सदस्य फोडून भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करत यशवंत विचारांच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार राजू भोसले यांना प्रत्येकी ३३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी-शिवसेना युतीच्या उमेदवारांना ३० मते मिळाली. भाजपचे दोन्ही उमेदवार ३ मतांनी विजयी झाले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. अभूतपूर्व गोंधळ, प्रचंड तणाव आणि पोलीस बंदोबस्तात झालेली जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच निवडणूक ठरली.

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या आदल्या रात्री (गुरूवारी) वाई तालुक्यातील एका सदस्याचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. संबंधित सदस्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन अपहरण झाले नसल्याचा जबाब दिला होता. तरीही पोलीस दोन सदस्यांना ताब्यात घेणार असल्याची कुणकुण पालकमंत्र्यांना लागली होती. त्यामुळे शंभूराज देसाई पहिल्यांदा जिल्हा परिषदेत आले. पोलिसांचे मनसुबे ध्यानात येताच त्या दोन सदस्यांना सायरन वाजवत थेट स्वतःच्या गाडीतून घेऊन आले.

    पालकमंत्री शंभूराज देसाईंचा आवेश पाहून पोलिसांनी त्यांना अडवले नाही. परंतु, जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या बाहेरच दोन्ही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात झटापट झाली. त्यात त्यांच्या हातात लागले आणि रक्त आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मंत्री शिवेंद्रराजे भोसले ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना शंभूराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

    राष्ट्रवादीच्या त्या दोन सदस्यांना मतदान करू द्या आणि मग कारवाई करा, असे शंभूराज देसाई सांगत होते. मात्र, पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. दोन्ही सदस्यांना मतदान करता न आल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संख्याबळ आणखीनच घटले. अखेर भाजपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार तीन मतांनी विजयी झाले.

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने महायुतीत आता दरी निर्माण झाली असून नेत्यांमधील संबंध देखील ताणले गेले आहेत. निवड प्रक्रियेनंतर माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी भाजपाला गर्भित इशारा दिला. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने जनमताचा अवमान भाजपाने केला आहे. या क्षणिक सुखाचा आनंद मिळेल. पण, पुढे अनेक निवडणुका आहेत. त्यावेळी आम्ही आमची भूमिका घेऊ. साताऱ्यातील पोलीस मंत्र्यांना धक्काबुक्की आणि मागे ढकलत असतील तर प्रशासन नक्कीच घरगड्याचे काम करतंय. आजच्या घटनेतून भाजपाने सुरुवात केली आहे. परंतु,त्याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी करेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा