• Sat. Jun 6th, 2026
    Unseasonal Rain: राज्यात अवकाळी, गारपिटीचा मारा; नाशिक, मराठवाड्यात पिकांचे नुकसान, पुण्यातही हजेरी

    मुंबई : एकीकडे तापमान प्रचंड वाढलेले असताना राज्याच्या काही भागात मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी गारपीट, पावसाचा मारा सुरूच राहिला. मराठवाड्यात लातूर, धाराशीव जिल्ह्यात गारपीट झाली. तर पुण्यातही पाऊस पडल्याने उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला. यामुळे अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाले.

    नाशिक जिल्ह्यात सिन्नरच्या पूर्व भागात गारपीट झाली, तर बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. निफाड तालुक्यात सव्वाचारच्या सुमारास जोरदार वारे, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे गहू, द्राक्ष आणि कांदा पिकांचे नुकसान झाले. मराठवाड्यातही पावसामुळे पिकांना फटका बसला.

    Raj Thackeray : ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाईट नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सविस्तर सांगितलं
    पावसाच्या हलक्या सरी
    पुणे शहराप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. भोर, वेल्हे, नसरापूर भागात पाऊस पडला. पुणे शहरातही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला. गुरुवारी दुपारी कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्त्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्येही पावसाची नोंद झाली.

    मराठवाड्यात दोन दिवस पाऊस
    मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात गारपीट झाली आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

    Maharashtra TimesRaj Thackeray: इराणवरील हल्ल्यांचा साधा निषेधही नाही! राज ठाकरेंची परराष्ट्र धोरणावर सडकून टीका
    द्राक्ष, गव्हासह कांद्याचे नुकसान
    निफाड : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास अचानक जोरदार वारे, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी बदलामुळे गहू, द्राक्ष आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. निफाड, चांदोरी, शिवरे, विंचूर, पिंपळस, जळगाव, कुंदेवाडी, उगाव, शिवडी, शिरवाडे, वाकद, कोळगाव, कानळद या भागांना फटका बसला. दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ असताना अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. गारपिटीमुळे द्राक्षबागांतील घडांचे नुकसान झाले, तर वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले.

    Maharashtra TimesGudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल
    उन्हाळी कांद्यालाही फटका बसला. वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि हवामानातील लहरीपणामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व पीकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील खडकमाळेगाव येथील द्राक्ष बागायतदार सयाजी त्र्यंबक शिंदे यांचा दीड एकरातील काढणीस आलेला द्राक्षबाग अवकाळी पावसामुळे पूर्णतः भुईसपाट झाला. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. त्यांच्या एसएसएन वाणाच्या द्राक्षांना प्रतिकिलो १११ रुपयांचा दर बुधवारीच (दि. १८) निश्चित झाला होता. परंतु, हे संकट कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed