Nashik News: या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे या प्रकरणात समोर येतात का, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे.
नाशिकच्या जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर, वरिष्ठ सहाय्यक, लेखा.वर्ग ३, पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, नाशिक या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
एका कंत्राटदाराकडून पाटबंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचे १६ लाखांचे बिल काढून देण्यासाठी ७२ हजारांची लाच मागण्यात आली होती. त्यांनंतर तडजोडी अंती ५० हजार देण्याचे ठरले होते. जिल्हा परिषद, जुनी इमारत, नाशिक येथे ही ५० हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, नाशिक वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर,वरिष्ठ सहाय्यक,लेखा.वर्ग ३,जिल्हा परिषद,नाशिक (जुनी इमारत)यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.
१८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. या आधी GST विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला २० लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यामुळे कोणी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हे सरकारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक भारत तांगडे यांच्याकडून करण्यात आलं आहे.
