Nashik Crime: या शस्त्राचा वापर कशासाठी करण्यात आला होता किंवा केला जाणार होता, याचा सखोल तपास आता सुरू आहे. त्यामुळे खरात याचा पाय आणखी खोलात जाणार आहे.
अशोक खरात याच्या मिरगाव इथल्या फार्म हाऊसवर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहर गुन्हे शाखा १ च्या पथकाने रात्री उशिरा मिरगाव शिवारातील खरात याच्या फार्म हाऊसची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. यामध्ये खरातच्या विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि काही संशयास्पद फाईल्सचा समावेश आहे. नाशिक पोलिसांनी हा सर्व ऐवज ताब्यात घेतला असून या कागदपत्रांच्या आधारे खरातच्या आर्थिक व्यवहारांची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या छाप्यातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, फार्म हाऊसच्या झडतीदरम्यान पोलिसांना एक पिस्तूल देखील सापडले असून, केवळ शस्त्रच नव्हे, तर पोलिसांनी तिथून काही जिवंत काडतुसे देखील जप्त केली असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जप्त करण्यात आलेले शस्त्र आणि मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
