• Fri. Sep 18th, 2026

Rain Alert: पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला झोडपणार, IMD चा ताजा अंदाज

Rain Alert: पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला झोडपणार, IMD चा ताजा अंदाज

नागपूर : विदर्भात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भावर सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश परिसरात उच्च दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम विदर्भातील हवामानावर होत आहे. या प्रणालीमुळे पुढील २४ तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन सुमारे २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ऑरेंज अलर्ट असलेल्या वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी १५० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते.

याशिवाय, सध्याच्या परिस्थितीत यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, रविवारपासून विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारनंतर विदर्भातील काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल आणि विशेष अलर्टही लागू राहणार नाही. मात्र, पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनी अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.