• Wed. Sep 9th, 2026

रानभाजी महोत्सवातून महिला बचतगटांना बाजारपेठ – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 5, 2026

नाशिक, दि. ५ (जिमाका): पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन, स्थानिक शेतमालाला बाजारपेठ आणि ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. महिला बचतगटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसाय उभारावेत. स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि लखपती दीदी बनावे, असे आवाहन जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद, नाशिक आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती, नाशिकच्या आवारात आयोजित तीन दिवसीय रानभाजी महोत्सवास पालकमंत्री महाजन यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील, नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्रीमती पांडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री महाजन यांनी विविध स्टॉल्सची पाहणी केली.


पालकमंत्री महाजन म्हणाले की, पूर्वी मुंबई येथे प्रदर्शनांचे आयोजन केले जात असे. मात्र, ग्रामीण भागातील सर्व उत्पादकांना मुंबईला येऊन स्टॉल लावणे शक्य नसल्याने विभागनिहाय प्रदर्शनांची संकल्पना पुढे आली. त्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर आणि अन्य ठिकाणी विभागनिहाय आयोजन करण्यात आले. आता जिल्हानिहाय प्रदर्शनांच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पादकांना सहभागी होण्याची संधी मिळत आहे. या प्रदर्शनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील रानभाज्या, बाजरी, नागली, ज्वारी यांसारख्या पारंपरिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश कमी होत चालला आहे. रानभाज्यांसारखे पारंपरिक पदार्थ आता दुर्मिळ होत असून, त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे. स्थानिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रदर्शनांमधून नागरिकांना पारंपरिक पदार्थांची ओळख करून देणे आवश्यक आहे. स्थानिक, ताज्या आणि पारंपरिक अन्नपदार्थांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांची निर्मिती, महिलांना प्रशिक्षण, भांडवल व बँक कर्जाची सुविधा, उद्योग उभारणी, ब्रँडिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते.


कुंभमेळ्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. या संधीचा लाभ महिला बचतगट, उद्योजक आणि स्थानिक उत्पादकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार म्हणाले की, रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत असून, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या उत्पादनांना मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचतगटांनी उत्पादनांचे मॅपिंग, आवश्यक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची तयारी करावी.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed