Lek Ladki Yojana : नवीन अर्ज प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या मदतीने आवश्यक माहिती स्वयंचलितपणे प्राप्त होणार असून लाभार्थी, माता आणि पिता यांची ई-केवायसी करण्यात येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा, यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात येणार आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नाही
या योजनेसाठी १ एप्रिल २०२३ पासून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. नवीन सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती स्वयंचलितपणे प्राप्त होणार असून लाभार्थी, माता आणि पिता यांची ई-केवायसी करण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच योजनेतील पुढील टप्प्यांतील लाभ मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
लेक लाडकी योजना काय आहे?
महिला व बालविकास विभागामार्फत ‘लेक लाडकी’ योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे. १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत जन्मानंतर पाच हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये, सहावीत प्रवेश घेतल्यानंतर सात हजार रुपये, अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ७५ हजार रुपये, असा एकूण एक लाख एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी आणि निकष
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे तसेच सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्न आणि अन्य पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा