• Tue. Jun 9th, 2026
    खाडीवर उभा राहतोय कोकणचा ‘गेमचेंजर’ पूल; रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे वाहतूक वेगवान होणार

    Revdanda-Salav Bridge: रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर (MSH-4) रेवदंडा-साळाव सागरी पुलाचं बांधकाम सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका खाडीवर हा ३.८ किमी लांब पूल उभारण्यात येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा आणि कोकणातील वाहतुकीचे चित्र बदलणारा बहुप्रतीक्षित साळाव-रेवदंडा (कुंडलिका खाडी) पूल सध्या वेगाने आकार घेत आहे. तब्बल १,२५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा हे तीन महत्त्वाचे तालुके अधिक प्रभावीपणे जोडले जाणार असून, भविष्यातील वाहतुकीसाठी हा पूल ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे.

    पुलाची रचना कशी आहे?

    रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील हा पूल सुमारे ३.८ किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीकडून त्याची उभारणी केली जात आहे. सध्या कुंडलिका खाडीच्या पात्रात आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाइल फाउंडेशन आणि खांब उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला गेल्या काही महिन्यांत विशेष गती मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

    Maharashtra TimesMrinaltai Gore Flyover: अर्ध्या तासाचा प्रवास १० मिनिटांत होणार, सात वर्षांनंतर गोरेगावमधील पुलाचा विस्तार पूर्ण; मार्गावर वाहतूक सुरू

    साळाव-रेवदंडा मार्गावरील विद्यमान पूल १९८६ मध्ये उभारण्यात आला होता. गेल्या चार दशकांत वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे आणि पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे नवीन पुलाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार शासनाने नव्या चारपदरी पुलाला मंजुरी दिली. सध्या या प्रकल्पाचे अंदाजे १५ ते २० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील दोन ते अडीच वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

    नवीन पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहतूक करण्यास सक्षम असेल. पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फूटपाथ, आकर्षक डेकोरेटिव्ह लाइटिंग, तसेच देखभाल आणि सुरक्षेसाठी इन्स्पेक्शन गॅलरीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा दुवा न राहता कोकणातील आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक ठरणार आहे.

    Maharashtra TimesThird Mumbai: सात बेटांपासून दूर बनतेय ‘तिसरी मुंबई’, 124 गावांचा समावेश; सिंगापूर स्थित कंपनी बनवणार ‘मास्टरप्लॅन’

    वाहतुकीवर निर्बंध कायम

    दरम्यान, नवीन पुलाचे काम सुरू असल्याने जुन्या पुलावर वाहतुकीवर निर्बंध कायम आहेत. सध्या केवळ पाच टनांपर्यंत वजन असलेल्या हलक्या वाहनांनाच या पुलावरून प्रवासाची परवानगी आहे. एसटी बस, ट्रक, कंटेनर आणि इतर अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रवासाचे अंतर वाढत असले तरी भविष्यातील सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी नागरिक हा त्रास सहन करत आहेत.

    २०२८ च्या सुरुवातीला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अलिबाग, मुरुड, रोहा तसेच दक्षिण रायगडातील अनेक भागांमधील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. पर्यटन, उद्योग, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. कुंडलिका खाडीवर आकार घेत असलेला हा भव्य पूल केवळ दोन किनारे जोडणार नाही, तर रायगडच्या विकासाचा नवा मार्गही खुला करणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा