• Tue. Jun 9th, 2026

    Mumbai Local: मुंबई लोकल अचानक ठप्प, सिग्नलच मिळेना; तक्रार प्राप्त होताच रेल्वेचे अधिकारी पोहोचले अन् धक्कादायक बाब उघड!

    Mumbai Local: मुंबई लोकल अचानक ठप्प, सिग्नलच मिळेना; तक्रार प्राप्त होताच रेल्वेचे अधिकारी पोहोचले अन् धक्कादायक बाब उघड!

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पनवेल रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या उद्देशाने चोरांनी सिग्नल केबल यंत्रणेची तोडफोड केल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सायंकाळी एक तास बंद होती. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) शोधमोहीम सुरू केली आहे. पनवेल यार्ड परिसरात सीसीटीव्ही नसल्याने त्याचा फायदा घेत केबलचोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे.

    पनवेल स्थानकाच्या अलीकडे शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे सिग्नल यंत्रणा अचानक बंद पडली. सिग्नल मिळत नसल्याने लोकल जागीच खोळंबल्या. याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांसह आरपीएफ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिग्नल केबलसह अन्य यंत्रणेची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील सिग्नल यंत्रणेला फटका बसला.

    सिग्नल केबल यंत्रणेचे नुकसान झाल्याचे कळताच रेल्वेचे दुरुस्तीपथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तासाभरानंतर सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली. त्यानंतर लोकलफेऱ्या सुरू झाल्या. सायंकाळी गर्दीच्या वेळेत हा गोंधळ झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत सीएसएमटी-पनवेल मार्गावरील लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तींनी सिग्नल केबल कापून ती चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना केबल संपूर्ण कापता आली नाही.

    दरम्यान, कल्याण ते कसारा मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामादरम्यान सिग्नल यंत्रणेची केबल अचानक तुटल्याने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असले, तरी यामुळे कल्याणपुढील वाहतुकीवर परिणाम झाला.

    कॉक्रोच ‘पार्टी’चा रेल्वेला धसका

    मुंबईतील लोकल गाड्यांचा प्रवास काही बेशिस्त प्रवाशांच्या मुजोरीमुळे त्रासदायक झाल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यातच लोकलगाड्यांमध्ये झुरळांचा उपद्रव वाढल्याचे आणि रेल्वे प्रशासनाकडून डब्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र हे वृत्त रेल्वे अधिकाऱ्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले असून ही ‘कॉक्रोच पार्टी’ कोणत्या लोकलगाडीत, कोणत्या मार्गावर सुरू आहे, याची तपशीलवार माहिती प्रशासनाकडून मागवण्यात येत आहे.

    ‘महाराष्ट्र टाइम्स’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘बेशिस्त प्रवासी मोकाट’ या वृत्तात लोकल डब्यात आसनावर पाय ठेवणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांवर नियमित कारवाई होत नसल्याचे वास्तव मांडण्यात आले होते. यातच डब्यांमधील झुरळांच्या समस्येलाही वाचा फोडण्यात आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित लोकल कोणती होती; कोणत्या मार्गावरची होती, याची माहिती जमा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

    सोशल मीडियावर सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची चर्चा सुरू असतानाच मुंबई लोकलमधील झुरळांचा मुद्दा समोर आल्याने प्रवाशांमध्येही या विषयाची चर्चा रंगली आहे. या वृत्ताची दखल वरिष्ठ स्तरावर घेतली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही केंद्र सरकारी कर्मचारी ‘मिशन कॉक्रोच’ राबवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल गाड्यांमध्ये आसनांच्या खाली झुरळांचा मुक्त संचार दिसून येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. काही वेळा प्रवाशांच्या चप्पल किंवा पायांवर झुरळे फिरताना दिसतात. अनेक प्रवासी वेफर्स, बिस्किटे, चॉकलेटची रिकामी पाकिटे डब्यांमध्येच टाकून देतात. काही जण आसनाखाली कचरा ढकलतात. परिणामी, झुरळांसाठी पोषक वातावरण तयार होते.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed