• Tue. Aug 4th, 2026

    Ratnagiri News: धावत्या बसमध्ये महिलेसोबत संतापजनक प्रकार; आधी उठवण्याच्या बहाण्याने स्पर्श, नंतर पुन्हा दुष्कृत्य, बस थेट पोलीस ठाण्यात!

    Ratnagiri News: धावत्या बसमध्ये महिलेसोबत संतापजनक प्रकार; आधी उठवण्याच्या बहाण्याने स्पर्श, नंतर पुन्हा दुष्कृत्य, बस थेट पोलीस ठाण्यात!

    रत्नागिरी: महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अशातच एका खासगी बसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्समधून गोव्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना एका महिला प्रवाशाचा दोनवेळा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाणे इथं एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की, खाजगी बस राजधानी ट्रॅव्हल्स (एमएच ४३ सीके 2981) मधून गोवा ते मुंबई असा प्रवास करत असताना संगमेश्वर या ठिकाणी आल्यानंतर बस थांबली होती. तेव्हा बसमधील क्लिनरने महिलेला उठवण्याचा बहाणा करून स्पर्श केला. त्यावेळी क्लिनरकडून चुकून स्पर्श झाल्याचं समजून सदर महिला शांत राहिली. मात्र पुढे आल्यानंतर पोलादपूरजवळ देखील क्लिनरने तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर सदर महिलेने पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधला आणि त्यानंतर बस थेट कोलाड पोलीस ठाणे इथं नेण्यात आली.

    पीडित महिलेने कोलाड पोलीस ठाणे येथे तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत पोलिसाना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा हा संगमेश्वर पोलीस ठाणे या हद्दीमध्ये घडलेला असल्याने पुढील तपासासाठी गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

    अंबादास दानवेंचा संताप

    ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. “गोव्याहून मुंबईकडे जात असलेल्या राजधानी ट्रॅव्हल्सच्या एमएच-४३-सिके-२९८१ क्रमांकाच्या बसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका महिला प्रवाशाला रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास बसच्या स्टाफकडूनच त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या मुजोर स्टाफला धडा शिकवण्यासाठी संबंधित बस आता कोलाड (जि. रायगड) पोलिस ठाण्यात वळवण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ म्हणणे केवळ घोषणांपुरते मर्यादित राहू नये, या महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलिस ठामपणे उभे आहेत, हे कृतीतून दाखवून द्यावं. या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा गाठ आमच्याशी आहे,” असा इशारा दानवे यांनी दिला आहे.