• Fri. Sep 11th, 2026

माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यांत पाणी टंचाई भासणार नाही असे नियोजन करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026


सातारा दि. ११: यंदा पाऊस कमी झाला आहे. विशेषतः माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी टँकरद्वारे पुरेसा आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये करावयाच्या उपायोजनेसंदर्भात आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होते.

टँकर सुरू असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा वेळेवर व व्यवस्थित होतो की नाही, तसेच ज्या स्त्रोतांवरून टँकर भरले जातात,त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पावसाळा संपण्यापूर्वी कमी पावसाच्या क्षेत्रातील सर्व बंधारे प्राधान्याने भरून घेण्यावेत. सध्या माण तालुक्यातील ६४ पैकी २९ बंधारे भरण्यात आले आहेत. आगामी १० दिवसांत माण तालुक्यातील उर्वरित सर्व बंधारे भरले जातील आणि त्यानंतर खटाव तालुक्यातील बंधारे भरण्याचे काम हाती घ्यावे. येत्या महिन्याभरात या सर्व भागांतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून पाण्याची कायमस्वरूपी योग्य व्यवस्था होएक या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची खबरदारी घ्यावी. पिकांची नजर पहाणी करावी. टंचाईच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed