• Fri. Mar 6th, 2026
    Raigad News: इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; रायगडमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

    इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल १०० रुपयांनी महागणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पाहा, नेमकं सत्य काय आहे आणि प्रशासनाने काय आवाहन केलंय…

    रायगड मुरुड विहूर पेट्रोल पंपावर नागरिकांची प्रचंड गर्दी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई निर्माण होईल, तसेच पेट्रोलच्या दरात तब्बल १०० रुपयांची वाढ होणार असल्याच्या अफवेमुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील विहूर येथील पेट्रोलपंपावर मंगळवारी अचानक मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. संभाव्य टंचाई आणि दरवाढीच्या भीतीने वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी धाव घेतल्याने पेट्रोलपंपावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

    सोशल मीडियावरील अफवेचा परिणाम

    युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधनपुरवठ्यावर परिणाम होईल, तसेच पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरली. “पेट्रोल १०० रुपयांनी महागणार” अशा अफवांनी नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली. परिणामी, अनेक वाहनचालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांमध्ये जास्तीत जास्त इंधन भरून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे विहूर येथील पेट्रोलपंपावर एकाच वेळी मोठी गर्दी उसळली.

    वाहनांच्या रांगांमुळे वाहतुकीवर परिणाम

    सकाळपासूनच अनेक वाहनचालक पेट्रोलपंपावर दाखल झाले होते. काही वेळातच वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाल्यामुळे स्थानिक वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

    Maharashtra TimesPune News: महिला दिनानिमित्त PMPML कडून पुणेकरांना खास भेट; केवळ 500 रुपयांत घडणार ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन

    प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि आवाहन

    दरम्यान, या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रत्यक्षात कोणतीही इंधनटंचाई नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित पेट्रोलपंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधनपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेट्रोलचे दर १०० रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा निव्वळ अफवा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे घाबरून इंधन साठवण्याची किंवा अनावश्यक गर्दी करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

    Maharashtra TimesNagpur Crime: कॉलेजमधले प्रेमसंबंध, सोनालीच्या लग्नानंतरही भेटायचा; नवऱ्यानं ट्रॅप लावला, होळीला गावी आलेल्या सागरची पती-पत्नीनं मिळून हत्या केली

    परिस्थिती आता पूर्ववत

    युद्धाच्या बातम्या आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपुष्ट माहितीमुळे अनेकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्याचाच परिणाम म्हणून पेट्रोलपंपावर ही गर्दी वाढल्याचे दिसून आले. मात्र, काही तासांतच वस्तूस्थिती समोर आल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली. इंधनपुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहनचालकांमधील भीतीही दूर झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा