• Fri. Mar 6th, 2026
    विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

    मुंबईत वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

    मुंबई, दि. ५ : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन गंभीर असून, बांधकाम प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन यंत्रे बसवणे, धूळ नियंत्रणाचे उपाय करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नात दिली.

    मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधकाम प्रकल्पांवर कोणती कार्यवाही करणार असा प्रश्न विधानसभा सदस्य मनीषा चौधरी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरांच्या तासात उपस्थित केला.

    या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व चालू बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन यंत्रे आणि एलईडी फ्लॅशर्स बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण २१,२२४ बांधकाम प्रकल्पांपैकी १९,५२१ ठिकाणी ही यंत्रे कार्यान्वित केली आहेत.

    राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मुंबईतील बांधकाम प्रकल्पांवरील प्रदूषण मापन यंत्रांचा पीएम 2.5 आणि पीएम 10 डेटा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी डॅशबोर्ड तयार आहेत. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच ते नागरिकांसाठी खुले केले जातील. आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४०० बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शहरात विनापरवाना कचरा (डेब्रीज) टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. मुंबईत ‘मुंबई वायू प्रदूषण शमन योजना २०२३’ अंतर्गत २५ कलमी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांधकाम स्थळी कुंपण, हिरव्या कापडाचे आच्छादन, पाणी फवारणी आणि रस्ते स्वच्छता यासारख्या उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

    राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, शहरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ३४५ लाकूड, कोळसा आधारित भट्टी, पावभाजी स्टॉल्स आणि स्मशानभूमीतील यंत्रणा पाइपलाइन नॅचरल गॅस (पीएनजी) किंवा विद्युत इंधनावर रूपांतरित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी बेस्ट ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला आहे.

    मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेता, महानगरपालिकेने प्रदूषणाचा सविस्तर आढावा घेऊन त्याचा अहवाल चालू अधिवेशन काळातच सादर करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला केल्या.

    या प्रश्नाच्या चर्चेत अजय चौधरी, वरुण सरदेसाई आणि अतुल भातखळकर यांनीही सहभाग घेतला.

    000

    नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये  उद्याने बांधण्यासाठी ३९४ कोटींच्या निधीची तरतूद – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

    मुंबई,दि.५: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये उद्याने बांधण्यासाठी ३९४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. उद्यान  निवडीचे जसे प्रस्ताव प्राप्त होतील त्या प्रमाणे कामे सूरू होतील, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

    राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये उद्याने बांधण्यासाठी दिलेल्या निधीचे काय झाले असा प्रश्न विधानसभेत तारांकित प्रश्नात विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

    राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नमो उद्याने विकसित करण्यासाठी विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. अद्याप याचे कोणतेही पारितोषिक  वितरण झालेले नाही. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नगरपरिषद, नगरपंचायतीस अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

    0000

    मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभागातील निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

    मुंबई, दि.5: मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील कामांसाठी राबविण्यात आलेल्या पारंपारिक निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

    मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील कामांसाठी राबविण्यात आलेल्या पारंपरिक निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य योगेश सागर, अमित साटम यांनी सहभाग घेतला.

    राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, संबंधित निविदा रद्द करण्यामागे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार प्रकल्प पीपीपी तत्वावर केल्यास महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो, असे कारण देण्यात आले आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्यात येईल. त्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल तसेच चौकशीचे आदेशही दिले जातील. या संदर्भात महापालिकेने घेतलेले आधीचे सर्व निर्णयही तपासून पाहिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘ई’ विभागासंदर्भातील आवश्यक माहिती संबंधित सदस्यांना दोन दिवसांत उपलब्ध करून दिली जाईल, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

    विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांच्या दालनात सर्व संबंधित सदस्यांची बैठक आयोजित करण्यात येईल. त्या बैठकीनंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले.

    0000

    कर्मचाऱ्याचा मृत्यूच्या चौकशीसाठी महानगरपालिकेकडून समिती नियुक्त – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

    नागपूर येथील कचरा वाहक कंटेनर दुर्घटना

    मुंबई, दि. 5 : नागपूर येथे कचरा वाहक कंटेनरखाली एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

    नागपूर येथे कचरा वाहक कंटेनरखाली येऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याबाबत विधानसभा सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य प्रविण दटके, विकास ठाकरे यांनी सहभाग घेतला.

    राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, कचरा वाहक डंपरवर काम सुरू असताना चालकाने अचानक बटण दाबल्यामुळे एका कामगाराचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला. महानगरपालिकेकडून कचरा वाहतूक करार करताना यंत्रसामग्रीची तपासणी केली जाते तसेच त्याची नियमित पाहणी केली जाते. कर्मचाऱ्यांची पडताळणी आणि शारीरिक चाचणीही केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    या घटनेनंतर मृत कामगाराच्या वारसांना कंपनीकडून 15 लाख रुपये आणि त्याच्या आईला पाच लाख रुपये देण्यात आले असून पत्नीला नोकरीही देण्यात आली आहे. तसेच कामगाराच्या नावावर काढलेल्या 25 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed