• Fri. Mar 6th, 2026

    शहा, फडणवीसांसमोर आश्वासन दिलेलं! राज्यसभेवरुन शिंदेसेनेत नाराजीनाट्य, माजी खासदाराची खदखद

    शहा, फडणवीसांसमोर आश्वासन दिलेलं! राज्यसभेवरुन शिंदेसेनेत नाराजीनाट्य, माजी खासदाराची खदखद

    मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला अवघे काही तास राहिलेले असताना शिंदेसेनेनं ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षातील वरिष्ठांना, दिग्गजांना मागे टाकून वाघमारेंनी राज्यसभेचं तिकीट मिळवलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर शिंदेसेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. माजी खासदारानं याबद्दल मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

    राज्यातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. यासाठी ४ पक्षांकडून ७ नावं जाहीर करण्यात आली आहेत. ७ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक बिनविरोध होईल. शिंदेसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रवक्त्या शायना एनसी यांची नावं चर्चेत होती. मात्र या दिग्गजांना मागे टाकून ज्योती वाघमारे यांनी बाजी मारली. यानंतर अडसूळ यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.

    वरिष्ठांच्या मनात जे होतं, ते झालं. आता त्यावर अधिक बोलणं मला योग्य वाटत नाही, अशा शब्दांत आनंदराव अडसूळ यांनी मनातील खंत बोलून दाखवली. केंद्रीय मंत्री अमित शहांपासून अनेकांनी आश्वासनं दिली. राज्यपाल करणार असं सांगितलं. त्याला २ वर्षे लोटली. या कालावधीत १० राज्यपाल नियुक्त झाले. पण माझा नंबर लागला नाही, असं अडसूळ म्हणाले.

    शेवटी मीच ऑफर दिली. राज्यपाल पदाचा विषय सोडा, तुमच्या कोट्यातून राज्यसभा तरी द्या. माझी मागणी काही चुकीची नव्हती. प्रत्येक वेळी हो हो म्हटलं जातं. पण होत काहीच नाही. त्यांनी दिलेलं नाही आणि भविष्यात देणारही नाहीत. हा माझा अनुभव आहे, अशा शब्दांत अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली.

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना अमित शहांसमोर बैठक झाली होती. तेव्हा लिखित प्रस्ताव दिला होता. अडसूळांना राज्यपालपद देऊ असं सांगितलं. पण ते काही दिलं नाही. राज्यपालपद मिळेना, तर किमान राज्यसभा तरी द्या म्हटलं. तर तेही नाही, अशा शब्दांत अडसूळ यांना त्यांची कैफियत मांडली. आपण पाच वेळा खासदार राहिलो. सहावेळा संसदरत्न पुरस्कार पटकावला, हे सांगायलाही अडसूळ विसरले नाहीत.

    ज्योती वाघमारेंचं नाव आज आम्ही ऐकलं. त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याचं आज शेवटच्या क्षणी समजलं, असं अडसूळ म्हणाले. राज्यसभेसाठी तुम्ही यापुढेही पाठपुरावा करावा करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर आता थांबलेलं नाही. जेव्हा वाटेल तेव्हा देतील. आतापर्यंत बराच पाठपुरावा केला, असं अडसूळ म्हणाले.

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed