सोने आणि चांदीच्या दरांना तेजीच्या हिरव्या रंगाची भुरळ पडली आहे. गुरुवार, 5 मार्च रोजी सोन्याच्या किमती वाढल्या असून चांदीचा भावही महागला आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे लोक सुरक्षित आश्रयस्थाने शोधत असल्याने सोन्याची मागणी वाढली असून युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि सहाव्या दिवसात प्रवेश करत आहे. धुळवडीच्या दोन दिवसांनी सोन्या-चांदीच्या दरांनी चांगलाच धुरळा करत मार्केट जाम केल्याचं दिसत आहे.
सोन्या-चांदीवर चढला तेजीचा रंग
अमेरिका-इराण युद्धादरम्यान सुरक्षित गुंतवणूक पर्यायांची मागणीत वाढ झाल्यामुळे गुरुवार, 5 मार्च रोजी सकाळी एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत जवळजवळ 1% वाढ झाली. मात्र, अमेरिकन डॉलरमधील वाढ आणि यूएस फेड रिझर्व्हकडून नजीकच्या काळात व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमकुवत झाल्यामुळे पिवळ्याधमक सोन्यातील दरवाढ मर्यादित राहिली. मध्यपूर्वेतील तणावाची परिस्थिती लवकरच सामान्य होताना दिसत नसून युद्ध सहाव्या दिवशी प्रवेश करत आहे, ज्यामुळे बाजार अडचणीत सापडले. सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, ज्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा मार्ग विस्कळीत झाले आहेत.गुरुवारी सकाळी सराफा बाजाराच्या ओपनिंगला एमसीएक्स सोन्याचा वायदा दर 1,600 रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 1% वाढून 1,63,142 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर एमसीएक्स चांदीचा मे फ्युचर्सचा भाव जवळपास 2% वाढून 2,70,501 रुपये प्रति किलोवर पोहोचलेला. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार सुरूच असून इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धांमध्ये सोन्याच्या किमतीत उलथापालथ होत आहेत.
डॉलर निर्देशांक 0.20% वाढून 98.98 वर पोहोचला, ज्यामुळे इतर चलनांमध्ये कमोडिटी खरेदी महागली. अमेरिका-इराण युद्धामुळे वाढत्या वस्तूंच्या किमतींमुळे वाढत्या महागाईच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन फेडच्या दर कपात लांबणीवर पडायची शक्यता असताना या आठवड्यात आतापर्यंत डॉलर निर्देशांकात 1% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
अमेरिकेतील हालचालींकडे लक्ष
इराणमध्ये अमेरिकेचा सतत हल्लाबोल सुरु असताना आता गुंतवणूकदारांचे लक्ष यूएसमधील रोजगार आकडेवारीकडे असेल जे या आठवड्यात शुक्रवारी जारी होतील. यामुळे फेड रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाबाबत चित्र स्पष्ट होईल. अपेक्षेपेक्षा मजबूत कामगार डेटा जाहीर झाल्यास डॉलर मजबूत होईल आणि बुलियनच्या किमतींवर भार वाढेल, तर कमकुवत आकडेवारी धोरणात्मक सुलभतेच्या अपेक्षांना बळकटी देऊ शकते आणि मौल्यवान धातूंना आणखी आधार मिळू शकतो.
