Jalna CA Raju Kolte : जालनामधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनी दुसऱ्यांच्या शेतात राबून आपल्या पोटच्या मुलाला सीए (CA) केलं आहे. त्याच्या या यशानं त्यांचा आनंद गगनाला भिडला आहे.
सालगडी मुलगा सीए (CA) झाला
किसनराव कोलते आणि सुनंदाबाई कोलते यांना गजानन आणि राजू हे 2 मुलं तर लक्ष्मी नावाची एक मुलगी आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने किसनराव कोलते गेल्या 40 वर्षांपासून भोकरदन येथील विनायक औटी यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत आहेत. आई सुनंदाबाई औटी शेतात शेतीमजुरी करून संसाराचा गाडा ओढत आहेत.
Raigad Crime : सहा महिन्यापूर्वी लग्न, हसता-खेळता संसार उद्ध्वस्त, बेपत्ता निकीताचं पार्थिव आढळलं; पतीवर संशयाची सुई
मोठा मुलगा गजानन एका दुकानात काम करून भाऊ व बहिणीच्या शिक्षणाला हातभार लावत होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापल्या परीने जबाबदारी उचलल्यामुळेच राजूला शिक्षणाची संधी मिळाली. राजू अभ्यासात हुशार होता; मात्र उच्च शिक्षणासाठी लागणारे पैसे आई-वडिलांकडे नव्हते. अशा परिस्थितीत विनायक औटी यांनी काही प्रमाणात आर्थिक मदत केली. त्या मदतीमुळे राजूने आपले शिक्षण सुरू ठेवले आणि अखेर सीए होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
‘सीए म्हणजे काय?’
1 मार्च रोजी सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात राजू कोलते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. निकाल लागल्यानंतर राजूने आपण सीए झाल्याची आनंदाची बातमी आई-वडिलांना दिली. त्यावेळी ते शेतात राबत होते. विशेष म्हणजे, ‘सीए म्हणजे काय?’ हेही आई-वडिलांना नीट माहिती नव्हते; मात्र आपल्या मुलाने घेतलेल्या कष्टाचे चीज झाले, एवढे मात्र त्यांना ठाऊक होते, असं वडील किसनराव कोलते यांनी सांगितलं. राजू सीए झाल्यानंतर त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. एका सालगड्याच्या मुलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवत कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
Nanded Petrol Pump : युद्धामुळे इंधन तुटवडा झाल्याची अफवा, वाहनधारकांची पेट्रोल पंपावर धाव, स्टॉक खरंच संपला, गर्दी टाळण्याचं आवाहन
दरम्यान, राजूची बहीण लक्ष्मी हिनेही फार्मासिस्टचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यामुळे कोलते कुटुंबातील दोन्ही मुलांनी शिक्षणाच्या बळावर आपलं भविष्य घडवलं आहे. गरिबी, कष्ट आणि संघर्ष यांना न जुमानता जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे राजू कोलते. त्याच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, ‘मेहनत आणि चिकाटी असेल तर स्वप्ने नक्की पूर्ण होतात,’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
