• Sat. Mar 7th, 2026
    Eknath Shinde : ‘भाईं’कडून दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानाची व्यवस्था

    दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज मुंबईत पर्यटकांना घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअरची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत:

    VTGSO हे विमान संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ करणार तर VT GSH हे विमान संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार नियोजित वेळेनुसार या विमानांनी टेकऑफ केल्याची शक्यता आहे. या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    कोल्हापूरचे प्रवासी मायदेशी परतले

    दरम्यान, दुबईला पर्यटनासाठी कोल्हापूरच्या 29 प्रवाशांचा गट आज कोल्हापुरात दाखल झाला आहे. या प्रवाशांनी आपल्याला आलेला थरारक अनुभव ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला सांगितला. आपल्या हॉटेलजवळच बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पर्यटकांनी दिली. तसेच दुबई विमानतळाला येत असताना देखील वाटेत बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज ऐकला, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. पण सुदैवाने आपण मायदेशी परतल्याचा आनंद आहे, अशी भावना या प्रवाशांनी व्यक्त केली. या सर्व प्रवाशांनी सरकारचे आभार मानले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा