• Mon. Mar 9th, 2026

    Dadar Railway Station: प्लॅटफॉर्मवरून कचरा उचलून रुळांवर फेकला, दादर स्थानकातील सफाई कामगाराचा Video समोर; नागरिक संतप्त

    Dadar Railway Station: प्लॅटफॉर्मवरून कचरा उचलून रुळांवर फेकला, दादर स्थानकातील सफाई कामगाराचा Video समोर; नागरिक संतप्त

    Sweeper Throwing Plastic Bottles on Track: नुकताच ‘एक्स’वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक सफाई कामगार प्लास्टिकच्या बाटल्या प्लॅटफॉर्मवरून उचलून रेल्वे ट्रॅकवर फेकताना दिसत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: दादर रेल्वे स्थानकावरील एका व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. एक्स वर नुकताच एका नागरिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सफाई कर्मचारी स्थानकावरून प्लास्टिकच्या बाटल्या रेल्वे रुळांवर फेकताना दिसत आहे. यामुळे स्थानकावरील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

    दादर रेल्वे स्थानकावरील घटना

    एक्सवरती सिंग वरुण नावाच्या एका यूझरने हा व्हिडिओ टाकला आहे. यामध्ये एक सफाई कर्मचारी दादर रेल्वे स्थानकावर झाडू मारताना दिसत आहे. त्यामध्ये त्याच्या शेजारी एक कचरापेटी देखील आहे. पण या कचरापेटीतून प्लास्टिकच्या बाटल्या उचलून तो कर्मचारी पुन्हा रेल्वे रूळांवर फेकताना दिसत आहे. स्थानक परिसर स्वच्छ करण्याऐवजी आणखी कचरा पसरवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

    ‘मला माहित नाही @drmmumbaicr ची माणसं कोणत्या प्रकाराची स्वच्छता मोहीम राबवत आहेत, मी या माणसाला प्लॅटफॉर्म साफ करताना, ट्रॅकवर बाटल्या फेकताना आणि प्लॅटफॉर्म झाडताना पाहिले. त्याने कचऱ्याच्या डब्यातून त्या बाटल्या उचलल्या आणि ट्रॅकवर फेकल्या,’ असे त्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याच वेळी त्यांनी मुंबई मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना टॅग करत हा सवाल केला.

    दरम्यान, यानंतरच त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये वरील घटनेच्या काही मिनिटांनंतरच एक माणूस रेल्वे रुळांवरून या बाटल्या उचलून घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेनंतर नागरिकांना कंत्राटी कामगारांच्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थितित केला आहे.

    वांद्रेमधील व्हिडिओही व्हायरल

    दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका विदेशी व्लॉगरने मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छता दाखवत व्हिडिओ केला होता. या भागांतील झोपडपट्टी परिसरात जाऊन कचरा दाखवत याची तुलना एखाद्या डम्पिंग ग्राऊंडशी केली. नंतर त्याने या व्हिडिओमध्ये मिठी नदीचे दृश्यही दाखवली. मिठी नदीतील गाळ आणि कचरा दाखवला आणि सरकार नदी स्वच्छ का नाही करत असा सवाल केला. यामुळेही मुंबईतील रेल्वे स्थानकं आणि परिसरातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा