Uran-Karjat-Shirur Highway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उरण-कर्जत-शिरूर महामार्ग प्रस्तावित केला होता. परंतु, अनेक महिने हा प्रस्ताव कागदावरच होता.
तासान् तास वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या महिन्यात तब्बल 32 तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय प्रत्येक वीकेंड किंवा सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर कोंडी होणे हे नागरिकांना अपेक्षितच असते. यासाठी पर्याय म्हणून उरण-कर्जत महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर 2025मध्येच एका बैठकीत मंत्रिमंडळासमोर यासाठी प्रस्ताव मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही हे काम कधी प्रत्यक्षात सुरूच झालं नाही.
अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा Ulwe Coastal Road, प्रवासात वाचणार 25 मिनिटं; 6.7 किमी मार्ग कुठून-कसा?
दरम्यान, एक्स्प्रेस वेवर अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे सलग दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी झाली तेव्हा हजारो प्रवासी, नोकरदार, मालवाहू वाहनचालक यांना तासन् तास अडकून पडले होते. अशा परिस्थितीत एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे–मुंबई वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, सुमारे 135 किलोमीटर लांबीचा चारपदरी शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत– उरण मल्टिनोडल कॉरिडॉर महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. सुमारे बारा ते साडेबारा कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा भार कमी करू शकतो.
कसा असेल मार्ग?
हा कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यास पुणे–पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. या मार्गामुळे शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत मार्गे थेट उरण (जेएनपीटी) कनेक्टिव्हिटी मिळणार असून, औद्योगिक आणि मालवाहतूक सुलभ होणार आहे. चाकण आणि शिरूर एमआयडीसीतील मालवाहू वाहनांना थेट बंदराशी जोड मिळाल्याने नगर रस्ता आणि एक्स्प्रेस वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
Pune Twin Tunnels: येरवडा-कात्रज दुहेरी बोगद्याला गती, पुणे उत्तर-दक्षिण प्रवास होणार सोपा; 54 किमी लांब मार्ग कुठे जोडणार?
प्रत्यक्षात हा प्रकल्प अद्याप निर्णय, मंजुरी आणि अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यातच अडकलेला आहे. वारंवार वाहतूक कोंडीचा फटका बसत असताना आणि पर्यायी मार्गाची गरज तीव्रतेने जाणवत असताना, हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन कधी हालचाल करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एक्स्प्रेस वेवरील कोंडी ही तात्पुरती समस्या नसून, ती भविष्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पर्यायी मार्गांचे नियोजन आणि अंमलबजावणी ही काळाची गरज ठरत असताना शिरूर–कर्जत–उरण कॉरिडॉरवर आता तरी ठोस निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
