• Fri. Mar 6th, 2026
    मध्य पूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका, द्राक्ष-केळ्यांसह भाज्यांची कोट्यवधींची निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल

    Nashik News : नाशिक विमानतळावरून आखाती देशांत दरमहा सुमारे पंचवीस कार्गो विमाने जात असून ही वाहतूक तूर्त थांबवण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशांत सुरू असलेली कोट्यवधीची निर्यात ठप्प झाली. जिल्ह्यातून चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत या देशांमध्ये ३,१०३ कोटींची निर्यात झाली असून, रविवारपासून अनिश्चित काळासाठी निर्यात बंद झाल्याने कोट्यवधीचा फटका बसण्याची भीती आहे.

    कोणकोणत्या पदार्थांची निर्यात?

    जिल्ह्यातून संयुक्त अरब अमिरात, इराक, सौदी अरब, कतार, कुवेत, इराण, बहरीन, इस्रायल या देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्यात कांदा, केळी, द्राक्षे, हिरवी मिरची, आंबे, टोमॅटो, भाजीपाला या कृषी उत्पादनांसह स्मार्टफोन, औद्योगिक वापराचे बोर्ड, पॅनल आदी वस्तूंचा समावेश असतो.

    नऊ महिन्यात ३,१०३ कोटींची निर्यात

    गेल्या एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातून या देशांना ३,१०३ कोटींची निर्यात करण्यात आली आहे. त्यापैकी दुबईत सर्वाधिक १,८२९ कोटींची निर्यात झाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून मध्य पूर्वेतील युद्धामुळे आखाती देशांकडे जाणारी हवाई व जलवाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.

    कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे, तर हवाई मार्गाने जाणारी खोकी नाशिक व मुंबई विमानतळावर अडकून पडली आहेत. नाशिक विमानतळावरून आखाती देशांत दरमहा सुमारे पंचवीस कार्गो विमाने जातात. ही वाहतूक तूर्त थांबवण्यात आली आहे. आखाती देश अनेक बाबींसाठी भारतावर अवलंबून असून, जिल्ह्यातून विशेषत: जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, वाहतूक थांबवण्यात आल्याने तेथे या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.

    महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला फटका

    इस्रायल व अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला आहे. याचा थेट फटका महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला बसला आहे. आखाती देशांत होणारी फळांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषतः जळगावची केळी आणि नाशिकच्या द्राक्षांची रवानगी थांबल्याने निर्यातदारांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे.

    रमजानमध्ये भारतीय फळांना आखातात मागणी

    सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशांत भारतीय फळांना मोठी मागणी असते. मात्र, युद्धामुळे वाहतूक साखळी विस्कळित झाली आहे. भारतातून आखाती देशांत होणारी केळीची दररोजची सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. एकट्या केळीचे सुमारे १४०० कंटेनर मुंबई बंदरात अडकून पडले आहेत.
    Maharashtra TimesKailash Kher : माणसं की जनावरं? नांदेडमधल्या रस्त्यांचे कैलाश खेरनी वाभाडे काढले, अशोक चव्हाणांसमोरच अ‍ॅक्टिंग करुन दाखवली

    हजारो कोटींच्या नुकसानाची भीती

    केळीबरोबरच नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आणि हंगामातील आंबा यांचीही निर्यात थांबली आहे. सर्व फळे नाशवंत असल्याने जर लवकर तोडगा निघाला नाही, तर हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर युद्धाचा तणाव निवळला नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही पोकळी भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम करू शकते.
    Maharashtra TimesUnmesh Patil : आधी भाजप सोडली, आता ठाकरेंना; माजी खासदार उन्मेष पाटलांचा ‘जय महाराष्ट्र’, शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला
    जळगाव जिल्ह्यातून निर्यातीसाठी जाणारे दररोजचे १० ते १५ कंटेनर सध्या थांबले आहेत. मात्र, सुदैवाने देशांतर्गत बाजारात (विशेषतः उत्तर भारतात) रमजानमुळे केळीला मागणी आहे. त्यामुळे सध्यातरी दरांवर फारसा परिणाम झालेला नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

    Iran vs Israel War : महिनाभर युद्ध सुरु राहण्याचे ट्रम्पचे संकेत, भारताला सर्वात जास्त महागाईची झळ

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा