उद्या चंद्रग्रहण असल्याने सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. ग्रहण काळात गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो, असा अतिरंजित दावा केला जातो. पण हे सर्व चुकीचं आहे. असा दावा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : यंदाच्या वर्षातले पहिले चंद्रग्रहण मंगळवारी (3 मार्च) आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अतिरंजित दावे केले जात आहेत. ग्रहणाचा महिलांच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो, अशा अंधश्रद्धा देखील पसरवण्यात येत आहेत. ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. तसेच ग्रहण ही एक खगोल शास्त्रीय घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे देखील अंनिसने स्पष्ट केले आहे.
ग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम होत नसताना त्याविषयी सोशल मीडियावर अतिरंजित दावे केले जात आहेत. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये, अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जातात. ग्रहणाचा गरोदर महिलेच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो, अशा अंधश्रद्धा देखील पसरवल्या जात असल्याबद्दल अंनिसने संताप व्यक्त केला आहे.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. त्यामध्ये कोणतीही ऊर्जा किंवा किरणे तयार होत नाहीत. दर सहा महिन्यानंतर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करताना कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो, असेही अंनिसने पत्रकात म्हटले आहे.
सोशल मीडियातील अवैज्ञानिक सल्ल्यामुळे तीन वर्षांपुर्वी साताऱ्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. गर्भवती महिलांवर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही, हे राज्यातील अनेक स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटनांनी वारंवार सांगितले आहे. तरीही ग्रहणाच्या काळात अनेक राष्ट्रीय वाहिन्या, सोशल मीडियावर संस्था आणि व्यक्तींकडून सातत्याने ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. त्याला कोणीही बळी पडू नये. चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणाऱ्या भारतातील नागरीकांनी आता अंधश्रद्धेचं ग्रहण सोडावं, असं आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा