Nagpur News: जर तपास अहवालात व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आढळला, तर कारखान्याचा स्फोटक निर्मितीचा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ शकतात.
पेसो आणि डिश या दोन्ही यंत्रणा प्रामुख्याने तांत्रिक आणि कायदेशीर निकषांवर आधारित तपास करत आहेत. या अंतर्गत पेसोद्वारे पॅकिंग युनिटमध्ये परवानगीपेक्षा जास्त स्फोटक साठा होता का, पॅकिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे नॉन-स्पार्किंग’ (ठिणगी न पडणारी) होती का, स्फोटकांसाठी आवश्यक असलेले तापमान आणि आर्द्रता युनिटमध्ये राखली गेली होती का, घर्षण किंवा स्थितिक विद्युत (स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी) रोखण्यासाठी अर्थिंग योग्य होते का, आदी बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे. तर डिश प्रामुख्याने कारखाना कायदा, १९४८ अंतर्गत कामगारांची सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती तपासत आहे. यामध्ये शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पुरेसा आराम मिळाला होता का, स्फोट झाल्यास ती परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण कामगारांना देण्यात आले होते का, कामगारांनी अँटी-स्टॅटिक कपडे आणि आवश्यक सुरक्षा साधने वापरली होती, या मुद्यांचा तपास डिश करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महत्त्वाचे मुद्दे असे
पेसो आणि डिश या दोन्ही यंत्रणा स्फोटाची सुरुवात नेमकी कुठून आणि कोणत्या प्रक्रियेदरम्यान झाली, युनिटमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे (एसओपी) पालन होत होते का, पॅकिंग रूममध्ये निर्धारित संख्येपेक्षा जास्त लोक उपस्थित होते का, मशिनरीमध्ये बिघाड झाल्यामुळे घर्षण निर्माण झाले का, कारखान्याचे शेवटचे इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट कधी झाले होते या महत्त्वाच्या मुद्यांवरदेखील अहवालात सविस्तर माहिती राहणार आहे. सध्या घटनास्थळावरून नमुने गोळा करण्यात आले असून, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होईल.
