छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरातील ‘त्या’ संशयास्पद मृत्यूचा थरारक उलगडा झाला आहे. चोरीच्या संशयावरून ४ सुरक्षा रक्षकांनी एका अज्ञात तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
अमानुष मारहाण
ऋषिकेश बबन वक्ते (वय २५ वर्षे), रोहित संतोष नगराळे (वय १९ वर्षे), चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (वय २१ वर्षे), राहुल बाबूराव दुतोंडे (वय २४ वर्षे), सर्व राहणार खंडोबा मंदिराजवळ, सातारा, अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक राहुल दुतोंडे हा कंपनीत कर्तव्यावर असताना त्याला वायर चोरी करण्यासाठी एक अज्ञात तरुण आल्याचा संशय आला. त्याने तात्काळ आपले इतर साथीदार ऋषिकेश वक्ते, रोहित नगराळे आणि चंद्रकांत मारकळ यांना बोलावून घेतले. या चौघांनी मिळून त्या तरुणाला पकडले आणि चोरीच्या संशयावरून त्याला टणक तसेच बोथट शस्त्रांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की त्या अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
POSH Audit : राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये 30 दिवसांत ‘पॉश ऑडिट’, अन्यथा कारवाई; महिला आयोगाचे निर्देश
पोलिसी खाक्यानंतर तोंड उघडलं
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. प्राथमिक अहवालात शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचे स्पष्ट झाले.सहाय्यक निरीक्षक शैलेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
Ajit Pawar : अजितदादांचं विमान जमिनीवर आदळताच पायलटचे शेवटचे शब्द काय? AAIB च्या 22 पानी अहवालात माहिती समोर
पोलिसांनी तातडीने या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृताची ओळख पटेना
घटनेला दहा दिवस उलटून गेले असूनही मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो तरुण नक्की कोण होता आणि तो कंपनीत कोणत्या उद्देशाने आला होता, याचा तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा रक्षकांच्या वर्तणुकीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
