• Mon. Jun 15th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar News : 300 ग्रामस्थांचा कला केंद्रात राडा, खुर्च्या तोडल्या, वाहने फोडली, नृत्यांगणा थोडक्यात बचावल्या

    Chhatrapati Sambhajinagar News : 300 ग्रामस्थांचा कला केंद्रात राडा, खुर्च्या तोडल्या, वाहने फोडली, नृत्यांगणा थोडक्यात बचावल्या

    छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात कला केंद्राबाहेर एका तरुणाला काही मद्यधुंद व्यक्तींनी मारहाण केली. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी कला केंद्रात घुसून तोडफोड केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथील कुलस्वामिनी कला केंद्रात शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोठा राडा झाला. एका किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून, संतापलेल्या सुमारे 300 ग्रामस्थांच्या जमावाने कला केंद्रावर चाल करून मोठी तोडफोड केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान या घटनेनंतर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यावेळी कला केंद्रातील महिलांनी कसातरी आपला जीव वाचवला. महिला योग्यवेळी सुरक्षितस्थळी गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची सध्या पैठण तालुक्यात चर्चा होत आहे. तसेच पोलिसांकडून सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात आहे.

    याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याने पायी जाणाऱ्या राजापूर येथील एका तरुणाला काही मद्यधुंद व्यक्तींनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. ही वार्ता राजापूर गावात वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता शेकडो ग्रामस्थ लाठ्या-काठ्या घेऊन कला केंद्रावर धडकले. आक्रमक झालेल्या जमावाने कला केंद्राचा मुख्य लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

    आक्रमक गावकऱ्यांनी कला केंद्रातील फर्निचर, महागडे सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल आणि विद्युत उपकरणांची अक्षरशः विल्हेवाट लावली. एवढेच नाही तर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 चारचाकी वाहनांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या दगडफेकीत 3 ते 4 जण जखमी झाले आहे. तसेच या घटनेवेळी बाहेरील शौकिनांचीही मोठी पळापळ झाली.

    जीव वाचवण्यासाठी नृत्यांगनांची पळापळ

    जमावाचा रौद्र अवतार पाहून कला केंद्रातील नृत्यांगनांची मोठी घाबरगुंडी उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ कार्यक्रम थांबवला आणि स्वतःला एका सुरक्षित खोलीत कोंडून घेतले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे महिला खूप घाबरल्या होत्या.

    20 गावांतील ग्रामस्थांचा कला केंद्राला तीव्र विरोध

    दरम्यान, हे कला केंद्र अनधिकृत असून ते तातडीने बंद व्हावे, अशी मागणी आडूळ परिसरातील सुमारे 20 गावांतील ग्रामस्थांनी वारंवार केली होती. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्यानेच हा जनआक्रोश उसळल्याची चर्चा परिसरात आहे. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा