मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा ता. यावल या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रहिवाशी दोन कुटुंबात शनिवारी सकाळी जुन्या वादावरून भांडण झाले. यात प्रथमेश मुकेश महाले (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०), रीना रोहित गजरे (वय १९) व निखिल राजेंद्र गजरे (वय २६) या चौघांवर एक अल्पवयीन तसेच सुधीर रमेश तायडे, मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरीस असलेला मनोज सुधीर तायडे, सचिन सुधीर तायडे, आरती सचिन तायडे, मंगलाबाई सुधीर तायडे सर्व रा. हिंगोणा ता. यावल व निखिल संजय तायडे रा. मारूळ ता. यावल यांनी एकत्र येऊन लाठ्या काठ्याने व चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात एका अल्पवयीन तसेच मुंबई पोलीस दलात असलेल्या मनोज तायडे यांनी चौघांवर चाकूने वार केले.यात प्रथमेश महाले वय १९ हा तरुण ठार झाला.
या घटनेनंतर हल्ल्यातील जखमी असलेल्या सर्वांना तातडीने सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. तर मयत प्रथमेश याचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले. तर याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रीना मोहित गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक अल्पवयीन सह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जदरम्यान, संशयित आरोपी आरती सचिन तायडे (२८), मंगला सुधीर तायडे (५१), सुधीर रमेश तायडे (५५), मनोज सुधीर तायडे (३१), सचिन सुधीर तायडे (३३), निखिल संजय तायडे (२४) यांच्यासह या गुन्ह्यातील एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकासह सर्व सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर हिंगोणा गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रथमेशचे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे
प्रथमेश महाले हा मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महाले कुटुंबात एकुलता एक होता. आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळावे म्हणून तो पोलीस भरतीचा सराव करत होता. त्याने मुंबई पोलीस दलात भरतीसाठी अर्ज केला होता. तो 23 फेब्रुवारीला मीरा-भाईंदर येथे पोलीस भरतीसाठी गेला होता आणि तिथे त्याने शारीरिक चाचणीत 50 पैकी 34 गुण मिळवले होते. तसंच प्रथमेश महालेचा गुरुवारी वाढदिवस होता, पोलीस भरतीची तयारी करताना शारीरिक चाचणी यश मिळाल्याने प्रथमेश व त्याचे मित्र आनंदी होते. गावात त्यांनी त्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता. मात्र पोलीस होण्याची जिद्द असलेल्या तरुणाच्या अशा प्रकारे खून झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.