Chhatrapati Sambhajinagar News: तरुणांच्या दुचाकीला धडक देणारे वाहन आयशर ट्रक असून त्यामध्ये ऊसतोड मजूर प्रवास करत होते, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगितलं जात आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अरमान शेख आणि आयान शहा हे दोघे मित्र आपल्या एका साथीदारासह दोन दुचाकीवरून २८ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास वैजापूरला निघाले होते. सणाचा उत्साह असल्याने हे तरुण आनंदाने कपडे खरेदीसाठी जात असताना खंडाळाजवळील जरूर फाटा येथे समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकींना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की आयान शहा याचा जागीच मृत्यू झाला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मालवली प्राणज्योत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवले. अरमान शेख हा गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेले जात होते. मात्र दुर्दैवाने अर्ध्या रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांचा तिसरा साथीदार फैजल खान हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
धडक देणारा ट्रक पसारप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांच्या दुचाकींना धडक देणारे वाहन एक आयशर ट्रक होते, ज्यामध्ये ऊसतोड मजूर प्रवास करत होते. अपघातानंतर हा ट्रकचालक वाहन न थांबवता सुसाट वेगाने निघून गेला. दोन तरुण मुलांचा असा अचानक आणि अकाली मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईदचा आनंद साजरा करण्याऐवजी आता या कुटुंबांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
