• Fri. Mar 6th, 2026
    Raj Thackeray: अजित पवारांच्या अपघातावरून संशयाचं धुकं; सुनेत्रा पवारांनी गांभीर्याने पाहावं, राज ठाकरेंची अपेक्षा

    Ajit Pawar Plane Crash: हा केवळ अपघात असेल आणि घातपात नसेल तर या प्रकरणी तक्रार नोंदवायला सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत? यामुळेच काहीतरी काळेबेरे आहे, असा संशय निर्माण होत असल्याचंही ठाकरे म्हणाले.

    अजित पवारांच्या अपघातावरून संशयाचं धुकं; सुनेत्रा पवारांनी गांभीर्याने पाहावं, राज ठाकरेंची अपेक्षा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा विषय हा राजकारणाच्या पलीकडचा असून तो महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिन्ही ठिकाणी सरकारकडून अडथळे आणले गेले. मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला जात असताना, तेथील पोलिस उपायुक्तांनी तो लिहून न घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सरकार किंवा पोलिस यंत्रणेला हा एफआयआर का नको आहे? अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर नोंदवला जात नसेल, तर सर्वसामान्य माणसाचे काय?’, असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी उपस्थित केले.

    अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी अधिक व्यापक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत रोहित पवार यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपशील मांडला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज ठाकरे यांनी एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल सरकारला प्रश्न केले.

    ‘अजित पवार धुक्यामुळे गेले की धोक्याने, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. लोकांच्या मनात पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय असून या प्रकरणी सरकारच संशयाची भुते नाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    ‘सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडावी’

    ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘अजित पवार हे त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघातासंदर्भात हा एफआयआर आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडावी. तसेच रोहित पवार यांनी हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात अधिवेशनात मांडावा आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करावा’, असा सल्ला मी दिल्याचे राज यांनी सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा