सातारा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कलेक्टर ऑफिससमोर एका कुरियर कर्मचाऱ्याकडून 22 तोळे दागिने लुटून पळून जाणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : कलेक्टर ऑफिससमोर कुरिअर कर्मचाऱ्याला मारहाण करून 22 तोळे दागिने लुटून पलायन केलेल्या दरोडेखोरांना अवघ्या 12 तासात जेरबंद करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. काल (शुक्रवारी) रात्री साडे बाराच्या सुमारास ही लूटमार झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग करत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कुरिअर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाच या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी दरोड्याच्या घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, साताऱ्यातील लक्ष्मी कुरिअर कंपनीचा कर्मचारी 22 तोळ्याचे दागिने घेऊन कोल्हापूरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून पुण्याला जाणार होता. त्यासाठी तो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असताना स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याला जबर मारहाण करत त्याच्याकडील दागिने लुटून कारमधून पलायन केले.
पोलिसांनी कारवाई कशी केली?
कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. संशयित आरोपी अहिल्यानगर मार्गे धुळ्याकडे चालले असल्याचे लक्षात आल्याने सातारा पोलिसांनी शिरपूर पोलिसांना अलर्ट केले.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील शिरपूर येथे सापळा रचून सातारा आणि शिरपूर पोलिसांनी पाचही दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी लुटलेले 22 तोळे सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. सध्या संशयितांना घेऊन सातारा शहर डीबी पथक साताऱ्याला येत आहे. अभिषेक शिकलगार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड आणि अजय राठोड, अशी संशयितांची नावे असून ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे आहेत. धाडसी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून दरोडेखोरांना जेरबंद केल्याबद्दल सातारा शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा