• Sat. Mar 7th, 2026
    Nashik News : ‘स्त्री बीज’ तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये;  महापालिकेची ‘IVF’ सेंटरला नोटीस

    नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूर स्त्री बीज तस्करी रॅकेटचे कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचलं आहे. या प्रकरणी नाशिक महापालिकेने IVF सेंटरला नोटीस पाठवली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : बदलापूर येथील स्त्री बीज तस्करी रॅकेटचे कनेक्शन आता नाशिकपर्यंत येऊन पोहोचले आहे. या प्रकरणाच्या तपासात आता नाशिकमधील एका आयव्हीएफ सेंटरचे नाव समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने या केंद्रावर धडक कारवाई केली आहे. बदलापूरच्या एका निवासी इमारतीतून चालवल्या जाणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर उघड झाला होता. याच तपासादरम्यान नाशिकच्या सदर सेंटरशी संबंधित काही संशयास्पद कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याची तातडीने दखल घेत नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांच्या नेतृत्वात पथकाने केंद्राची तपासणी करत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे.

    कायद्यानुसार स्त्री बीज दानावर मर्यादा असताना, एकाच महिलेची अनेक बनावट आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्रेही तयार केली जात होती. आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना 25 ते 30 हजारांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून तब्बल 30 वेळा बीजे काढली गेली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.या महिलांकडून कवडीमोल भावात घेतलेली बीज मुंबई ठाण्यातील मोठ्या रुग्णालयांना लाखो रुपयात विकली गेल्याचा संशय आहे.

    नाशिक महापालिकेकडून संबंधित सेंटरला प्रशासकीय नोटीस बजावत बदलापूर इथल्या प्रकरणाशी असलेल्या संबंधाबाबत लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये 300 हून अधिक महिलांचे शोषण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तपासाच्या अंतिम निष्कर्षांच्या आधारावर सेंटरवर कठोर कारवाई करण्याची संकेत देखील प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

    ‘दोषी आढळल्यास गय केली जाणार नाही’, मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

    “बदलापूर छाप्यामधील नाशिकच्या सेंटरचे आढळलेले प्रमाणपत्र हे आम्ही आता तपासात आहोत, तशी मोहीम देखील राबवली आहे. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी देखील सुरू आहे. दोषी आढळल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही”, अशी प्रतिक्रिया नाशिक मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा