• Fri. Mar 6th, 2026

    HSC Exam: बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला संस्थाचालक अन् नातेवाईकांकडून चोप; जागीच निलंबनाची कारवाई

    HSC Exam: बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला संस्थाचालक अन् नातेवाईकांकडून चोप; जागीच निलंबनाची कारवाई

    Crime News: आरोपी शिक्षकाने फक्त या एकाच विद्यार्थिनीला नाही, तर इतर विद्यार्थिनींसोबतही गैरप्रकार केला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

    बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला संस्थाचालक अन् नातेवाईकांकडून चोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना, छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी आणि शाळा संस्थाचालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे.

    या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक परीक्षा केंद्रावर ‘गार्डिंग’च्या कामासाठी नियुक्त होता. परीक्षा केंद्रावर आलेल्या एका विद्यार्थिनीशी त्याने गैरवर्तन केले आणि तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. एवढ्यावरच न थांबता, त्या शिक्षकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिक्षकाच्या या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने धाडस दाखवत सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर संतापलेले नातेवाईक थेट परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यांनी संस्थाचालकांच्या उपस्थितीत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. यावेळी शिक्षकाने आपली चूक झाल्याची कबुली दिल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळत आहे.

    शिक्षकाचे कृत्य उघड झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि उपस्थित संस्थाचालकांनी त्याला भररस्त्यात चोप दिला. या शिक्षकाने केवळ या एकाच मुलीला नाही, तर इतर विद्यार्थिनींनाही अशाच प्रकारे त्रास दिला असावा, असा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे.

    प्रशासनाची मोठी कारवाई: शिक्षक निलंबित
    घटनेचे गांभीर्य ओळखून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, संबंधित शिक्षकावर तातडीने कठोर कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकाला पदावरून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी, शिक्षण क्षेत्रात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा