मुंबई, दि. ४ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुराचे माजी राज्यपाल शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. डॉ. डी. वाय. पाटील हे त्रिपुराचे राज्यपाल असताना त्यांच्याशी घनिष्ट परिचय झाला. त्रिपुरा तसेच बिहार येथे राज्यपाल पदावर कार्य करीत असताना आपले विनम्र आचरण व सौजन्यशील स्वभावामुळे त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली. डॉ. डी. वाय. पाटील हे द्रष्टे शिक्षण तज्ज्ञ होते.
उत्तर – पूर्व राज्यातील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले. डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था उभारल्या. गेल्या तीन दशकांमध्ये या संस्थांनी लाखो विद्यार्थी घडवले असून आज ते विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. समाजकारण, राजकारण व शिक्षण क्षेत्रातील डॉ.पाटील यांचे कार्य भावी पिढ्यांना मार्गदर्शक राहील. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
000
