• Sat. Jun 13th, 2026
    Pandharpur News: वाढदिवसाच्या शॉपिंगला दुचाकीने जात होते, मध्येच नको ते घडलं, बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात करुण अंत

    वाढदिवसाच्या आदल्या दिवशी नवीन कपडे घेण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला असून…

    माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अरुण बाबर, पंढरपूर: माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील स्वप्निल सुळे आणि राजवर्धन शिरतोडे या दोघांचा दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. स्वप्निलचा वाढदिवस असल्यामुळे मित्र कपडे आणण्यासाठी पिलीवला जात होते. मात्र, वाटेतच दोन दुचाकींची भीषण धडक झाल्याने दोघांना जीव गमवावा लागला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

    माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील म्हसवड रोडवरील बागवान टेकाजवळ २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० च्या सुमारास हा अपघात घडला. राजवर्धन बापू शिरतोडे (वय १८) हा आपल्या स्प्लेंडर गाडीवरून (MH 11 CE 5828) पिलीवहून आपल्या खडकी (ता. माण, जि. सातारा) या गावाकडे जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने सुळेवाडीकडून एच.एफ. डिलक्स (MH 45 AG 6790) या गाडीवरून स्वप्निल (समाधान) शिंगू सुळे, साईराज सत्यवान सुळे व गणेश रामचंद्र माने (तिघांचेही वय १८ वर्षे) हे येत होते. स्वप्निलचा २७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने कपडे खरेदी करण्यासाठी ते पिलीवला जात होते. एका चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात या दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

    या अपघातात राजवर्धन शिरतोडे याचे हात-पाय फ्रॅक्चर झाले, तर स्वप्निल सुळेला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. राजवर्धनला अकलूज येथील रुग्णालयात नेत असताना वेळापूरजवळच त्याचा मृत्यू झाला. तर स्वप्निल सुळेवर अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री १:३० च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

    Maharashtra TimesPune Crime: भिगवण प्रकरणात चर्चेत असलेल्या अझर शेखचा ‘गेम ओव्हर’; पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना केली अटक

    या अपघातात साईराज सुळे याचा पाय मोडला असून गणेश माने हादेखील गंभीर जखमी झाला आहे. या दोघांवरही अकलूज येथील इनामदार यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वप्निल सुळे, साईराज सुळे व गणेश माने हे तिघेही सुळेवाडी गावचे असून म्हसवड येथे बारावीत शिकत होते. सध्या बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आहे.

    ‘एमएच-सीईटी’ परीक्षेची तयारी करून पुढील शिक्षणाचे स्वप्न पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. स्वप्निलचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा