• Fri. Jun 19th, 2026

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 27, 2026
    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    मानववन्यजीव संघर्ष दूर करण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवू  वनेमंत्री गणेश नाईक

    मुंबई, दि. 27 :- मानव–वन्यजीव संघर्ष दूर करण्याबरोबरच पर्यायी शेती व पुनर्वसनासह दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत केले.

    नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे बफर क्षेत्र वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

    मंत्री नाईक म्हणाले की, 7 सप्टेंबर 2016 रोजी शासनाने अधिसूचना काढून गोंदिया प्रादेशिक, गोंदिया एमटीसीएम आणि भंडारा एमटीसीएम. (वन्यजीव) हे विभाग एकत्र करून त्यांचे नियंत्रण एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्याघ्र प्रकल्प एकसंघ नियंत्रणाखाली आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने 15 फेब्रुवारी 2012 रोजी राज्य शासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या 23व्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

    व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांवर कोणतीही अतिरिक्त बंधने येणार नाहीत, असे सांगून मंत्री नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती, विहीर खोदणे, विद्यमान रस्त्यांचा वापर यावर कोणतीही मर्यादा येणार नाही. केवळ नवीन बांधकामांबाबत कायदेशीर चौकटीतील निर्बंध लागू राहतील. गावांचा बफर क्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही व स्थानिकांच्या रोजगारावर प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

    नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासंदर्भातील सुधारित प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले. यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या असल्याचे सांगताना मंत्री नाईक यांनी ताडोबा परिसरात 500 फूट रुंदीची बांबूची भिंत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले. तसेच पकडण्यात येणाऱ्या माकडांना प्रकल्प क्षेत्रात सोडून त्यांच्या खाद्याची सोय करण्याची योजना राबवली जाणार आहे. गावांचे स्वेच्छेने स्थलांतर हवे असल्यास शासन आवश्यक जागा व आर्थिक मदत देण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले

    वन विकास महामंडळाने (एफडीसीएम) केलेल्या साग लागवडीमुळे सध्या सुमारे 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती उपलब्ध असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले. या संपत्तीच्या आधारावर सुमारे 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर, या निधीतून वनखात्याचे रस्ते, पर्यटन विकास, कार्यालये, विश्रांतीगृहे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतन व सुविधा यासाठी खर्च करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार असल्याचे मंत्री नाईक यांनी सभागृहाला सांगितले.

    या प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही उपप्रश्न विचारले.

    0000

    हिंगोलीतील मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद – मंत्री भरत गोगावले

     मुंबई, दि. 27 : हिंगोली जिल्ह्यातील मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानपरिषदेत दिली.

    विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गोगावले म्हणाले की,  हा प्रकल्प शेतकरी कुटुंबाशी संबंधित असून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेले आहे. त्यामुळे त्याला योग्य दर्जा आणि सुविधा देण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

    मंत्री गोगावले यांनी यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी पूर्वी 100 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 87 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामांसाठी आवश्यक निधीला मान्यता देण्यात आली असून, अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाईल. त्याचबरोबर, आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    0000

    संजय ओरके/विसंअ

    महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    24 ते 26 डब्यांच्या ट्रेन हाताळणार, सहा नवे प्लॅटफॉर्म, नवे प्रवेशद्वार; पुणे रेल्वे स्थानकात मोठे बदल होणार
    राज्यातील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा अहवाल सहा महिन्यांत सादर करा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed