उमेरड मोहपा मार्ग सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, दि. २७ : नागपूर जिल्ह्यातील उमरेड-मोहपा मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव तयार असून प्राधान्याने काम हाती घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील उमेरड-मोहपा मार्गावर अवजड वाहनांमुळे झालेल्या खड्ड्यांमुळे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी एका बारावीच्या मुलीचा ट्रकच्या धडकेत झालेल्या मृत्यूसंदर्भात सदस्य संजय मेश्राम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले.
मंत्री भोसले म्हणाले की, उमरेड-मोहपा या मार्गावर स्टोन क्रशर व खाणी आहेत, त्यामुळे अवजड वाहतूक होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा रस्ता कायमस्वरुपी चांगला करण्यासाठी सिमेंट कॉक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच या मार्गावरील काही भाग हा वन विभागातून जात असल्याने त्या मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव वन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. वन विभागाची मंजुरी लवकरात लवकर घेऊन काम सुरू करण्यात येईल.
००००
नंदकुमार वाघमारे / विसंअ
