• Sat. Mar 7th, 2026
    अजितदादांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं? सरकार FIRला का घाबरतंय? राज ठाकरेंचे बिनतोड सवाल

    Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवारांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसेल आणि तोही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी तर यात नेमकं काळंबेरं आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी सरकारच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली.

    अपघात धुक्यानं झाला की धोक्यानं झाला, असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. ‘विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत अजून काहीच समजलेलं नाही. सरकार एफआयआर का नोंदवू देत नाही?’ असा सवाल मनसे प्रमुखांनी उपस्थित केला. ‘एफआयआरबाबत सरकारने उत्तर दिलं पाहिजे. एफआयआरचा मुद्दा आमदारांनी अधिवेशनात मांडावा. शरद पवारांच्या खासदारांनी लोकसभेत याबद्दलचे प्रश्न उपस्थित करावेत’, असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.

    रोहित पवार तीन-तीन ठिकाणी एफआयआर नोंदवायला गेले. एकाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा एफआयआर नोंदवला गेला नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक अधिकारी त्यांचा एफआयआर लिहून घेत होता. तितक्यात तिथे डीसीपी आले. त्यांनी एफआयआर नोंदवून घेऊ नका, असं सांगितलं. अजित पवारांचा मृत्यू अपघातानं झाला असेल, त्यात घातपात नसेल, तर मग सरकार एफआयआर का नोंदवू देत नाही, असा थेट सवाल राज यांनी उपस्थित केला.

    साधा एफआयआर होऊ नये म्हणून सरकार दबाव का टाकतंय, सुनेत्रा वहिनी त्याच सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनीही याबद्दल बोलायला हवं. तीन-तीन पोलीस स्टेशनात जाऊनही एफआयआर घेतला जात नाही. इथेच संशयाची सुई आहे. या सगळ्यामुळे लोकांच्या मनात शंका आहेत. अपघाताला महिना होत आला तरीही अद्याप प्राथमिक अहवाल आलेला नाही, याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.

    सीबीआय, सीआयडी सगळ्या गोष्टी सोडा. सरकार या प्रकरणात एफआयआर का नोंदवू देत नाही, ते सांगा, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार एका एफआयआरला इतकं का घाबरतंय, या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. सुनेत्रा पवारांनी या सगळ्यावर बोलायला हवं. त्यांचे पती या अपघातात गेले आहेत. याच प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील या सगळ्यावर बोलायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा