• Sun. Jun 7th, 2026

    Sunetra Pawar: कंठ दाटला, हुंदका आवरला! ‘विचारांचा वारसा शेवटपर्यंत जपणार’; अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण

    Sunetra Pawar: कंठ दाटला, हुंदका आवरला! ‘विचारांचा वारसा शेवटपर्यंत जपणार’; अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी भावूक होत कार्यकर्त्यांना संबोधित केले. अजित दादांनी दिलेला वसा टाकणार नाही आणि संपूर्ण पक्ष हाच माझा परिवार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

    अजित दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी स्वीकारली पक्षाची धुरा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आज सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे स्वीकारली. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या. “अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, पण त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आणि विकासाचा मार्ग मी शेवटपर्यंत जपेल,” असा शब्द त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

    हा सन्मान तळागाळातील कार्यकर्त्यांचा

    भाषणाच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी महापुरुषांना अभिवादन करत पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “माझ्यावर जो विश्वास तुम्ही टाकला आहे, तो माझ्यासाठी केवळ एक पद नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या आशा-आकांक्षा आणि संघर्षाची जबाबदारी आहे. हा सन्मान माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माता-भगिनींचा आणि जनमानसाचा आहे.”

    अजितदादांच्या आठवणीने दाटला कंठ

    अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांना आपला हुंदका आवरता आला नाही. “आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत, हे मन मानायला तयार नाही. त्यांचा मृत्यू हा एक मोठा आघात आहे. ३० जून २०२३ रोजी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. अवघ्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षाची ताकत तिपटीने वाढवली. त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले असले तरी, आपण सर्वांनी मिळून ते पूर्णत्वास नेऊ,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

    Maharashtra TimesRohit Pawar: ‘गोळा केलेले पुरावे सुपूर्द केले’; CID ची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

    पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे ध्येय

    पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक विचार आणि समृद्धीचा परिवार आहे. ग्रामीण भागात आपली पाळेमुळे घट्ट आहेतच, पण आता शहरी भागातही जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे. तरुण कार्यकर्त्यांना बळ देऊन आणि महिला सक्षमीकरणावर भर देऊन आपल्याला पुन्हा एकदा पक्षाला ‘राष्ट्रीय पक्षाचा’ दर्जा मिळवून द्यायचा आहे.”

    तंत्रज्ञान आणि कृषी विकासावर भर

    शेतकरी हा पक्षाचा कणा असल्याचे सांगत त्यांनी अजित पवारांच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) धोरणाचा उल्लेख केला. “शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी दादांनी नेहमीच तंत्रज्ञानाचा आग्रह धरला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना आधुनिकतेची जोड देणे हेच आमचे प्राधान्य असेल. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर प्रशासनातही त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे त्या म्हणाल्या.

    Maharashtra TimesPune Crime: ‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस’ म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    “केवळ पार्थ-जयच नाही, तर संपूर्ण पक्ष माझा परिवार”

    आपल्या भाषणाचा शेवट त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केला. त्या म्हणाल्या, “आज माझ्यासमोर राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि माझ्या आजी सासूबाई शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा आहे. केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे. दादांनी ज्या आत्मीयतेने हा पक्ष जपला, त्याच पद्धतीने मी या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मी शब्द देते की, ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही’.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा