Raigad News: एका शिक्षिकेने प्रबळगडावरुन उडी मारुन जीव दिला आहे. पुढील आठवड्यात तिचा विवाह होणार होता. पण त्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पनवेल तालुक्यातील माची प्रबळगड येथे एका २८ वर्षीय शिक्षिकेने खोल दरीत उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. प्रीती संजू सिंग असे मयत तरुणीचे नाव असून त्या मूळच्या बिहार राज्यातील रहिवासी होत्या. सध्या त्या नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १२ येथे वास्तव्यास होत्या. विशेष म्हणजे, येत्या ३ मार्च रोजी त्यांचा विवाह होणार होता. लग्न ५ दिवसांवर असताना प्रीती यांनी जीव दिला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. टोकाचा पाऊल उतलण्यापूर्वी प्रीतीनं तिच्या भावाला गुडबाय असा मेसेज केला होता.
प्राप्त माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील पोयंजे बीट हद्दीत एका महिलेने गडाच्या टोकावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला परिसरात कोणतीही व्यक्ती आढळून न आल्याने शोधमोहीम अधिक कठीण झाली. माहिती देणाऱ्याचा संपर्कही तुटल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले.
गडावरील स्थानिक वस्तीतील नागरिकांकडून एक महिला दरीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील युवकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. घनदाट जंगल, निसरड्या पायवाटा आणि खोल दरी अशा धोकादायक परिस्थितीत दोरीच्या साहाय्याने पोलीस खाली उतरून संबंधित महिलेपर्यंत पोहोचले. ती हालचाल नसलेल्या अवस्थेत आढळली. तिला वर आणून तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात घरगुती कारणावरून रागाच्या भरात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
माची प्रबळगड परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो. उंच कडे, अरुंद पायवाटा आणि कोणतेही संरक्षण रेलिंग नसल्याने येथे अपघात किंवा दुर्घटनेचा मोठा धोका असतो. अशा कठीण भौगोलिक परिस्थितीत पोलिसांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेले धैर्य उल्लेखनीय ठरले.
लग्नाच्या काही दिवस आधीच तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करत आहे. ज्या घरात शहनाई वाजण्याची तयारी सुरू होती, त्या घरावर अचानक शोककळा पसरली आहे.
