बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. दोषी IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नाशिक कनेक्शन आणि ‘मालती’ IVF सेंटर रडारवर
या प्रकरणाचा तपास करत असताना रूपाली चाकणकर यांनी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. नाशिकमधील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’ ठाण्यातून आपले कामकाज चालवत होते. या सेंटरचा या तस्करीमध्ये थेट सहभाग असल्याची शक्यता असून, त्या माध्यमातूनच हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “स्त्रीबीज तस्करीचे हे रॅकेट केवळ बदलापूर किंवा ठाण्यापुरते मर्यादित नसून, याची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह राज्याबाहेरही पसरलेली आहेत,” असे चाकणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
बोगस कागदपत्रांचा आधार आणि पाच जणांना बेड्या
बदलापूर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या टोळीने बोगस कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख लपवून हा काळाबाजार सुरू ठेवला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे आंतरराज्य रॅकेट उघड झाले असून, चाकणकर यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास करून यात सहभागी असलेल्या ‘मोठ्या माशांना’ शोधून काढण्याचे आव्हान आता यंत्रणांसमोर आहे.
Sunetra Pawar: कंठ दाटला, हुंदका आवरला! ‘विचारांचा वारसा शेवटपर्यंत जपणार’; अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण
नेमका काय आहे हा भयंकर प्रकार?
हे रॅकेट बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटीमधून चालवले जात होते. सुलक्षणा गाडेकर नावाची महिला गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या घरातच बेकायदेशीरपणे स्त्रीबीज वाढीसाठीची इंजेक्शन्स देत होती. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सोनोग्राफी करून घेतल्यावर, संबंधित महिलेला विशिष्ट आयव्हीएफ सेंटरमध्ये नेले जाई. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन अंडाशय काढून त्याची हजारो रुपयांना विक्री केली जात असे.
या जीवघेण्या प्रकारामुळे महिलांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता. आता आरोग्य विभाग आणि पोलीस या साखळीतील डॉक्टरांचा शोध घेत आहेत.
